Ahmad Shahzad lashes out at the PCB after Bangladesh beat Pakistan : बांगलादेशकडून रावळपिंडी कसोटीत १० विकेट्सनी पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू संतापले आहेत. या पराभवासाठी कोणी कर्णधाराला दोष देत आहेत तर कोणी संघ व्यवस्थापनाला जबाबदार धरत आहेत. आता अहमद शहजादने पीसीबीवर आपला संताप व्यक्त केला आहे. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघ सर्वात खालच्या पातळीवर पोहोचला आहे, असे त्याचे मत आहे. तो म्हणाला की, संघात असे अनेक खेळाडू आहेत जे चांगली कामगिरी करत नाहीत, तरीही पीसीबी त्यांना संघात ठेवत आहे. पीसीबी देशांतर्गत क्रिकेटपटूंना पुढे येऊ देत नसल्याचा आरोपही शहजादने केला आहे.
हेही वाचा – PAK vs BAN : पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर मुशफिकर रहीमने घेतला मोठा निर्णय, जिंकली चाहत्यांची मनं
अहमद शहजादने एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो म्हणत आहे की, “पाकिस्तान क्रिकेटची अवस्था अशी झाली आहे की आज बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर प्रथमच पराभूत केले आहे. मी माझ्या आयुष्यात पाकिस्तान क्रिकेट इतके खालच्या पातळीवर गेलेले पाहिले नाही. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण… चांगलं-वाईट, हे सगळं नंतरसाठी आहे, पण पाकिस्तानने नवा नीचांक गाठला आहे, जो मी माझ्या आयुष्यात कधीही पाहिला नाही.”
माजी खेळाडू पुढे म्हणाला, “पाकिस्तानला या पराभवातून मोठ्या कष्टाने बाहेर पडता येईल, ज्याप्रमाणे तो आजपर्यंत अफगाणिस्तानाविरुद्धच्या पराभवातून बाहेर पडू शकला नाही, त्याचप्रमाणे पाकिस्तानला या पराभवातून मोठ्या कष्टाने बाहेर पडावे लागेल.” या पाकिस्तानी खेळाडूने सांगितले की, पाकिस्तानचा संघ अधोगतीकडे चालला आहे. त्यामुळे त्याने पाकिस्तान क्रिकेट संघाची तुलना आपल्या देशाच्या हॉकी संघाशी केली. क्रिकेट संघाची अवस्थाही हॉकीसारखीच असल्याचे तो म्हणाला.
पीसीबीवर आरोप करताना तो शेवटी म्हणाला, “यामध्ये खेळाडूंची चूक आहे असे मी मानत नाही. यात खेळाडूंचा काही दोष आहे असे मला वाटत नाही, दोष पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आहे. कारण खेळाडू कधीही जबरदस्तीने तुम्हाला संघात सामील करण्यास सांगत नाहीत. तुम्ही ते लोक आहात त्यांना सतत खेळवत आहेत. तुम्हीच लोक आहात जे देशांतर्गत खेळाडूंना येऊ देत नाहीत. तुम्ही तेच लोक आहात जे स्वतः म्हणत आहेत की आमच्याकडे देशांतर्गत काहीही नाही. त्यामुळे तुमच्याकडे देशांतर्गत असे खेळाडू नाहीत, जे या राष्ट्रीय संघातील खेळाडूंचा जागा घेऊ शकतील, मग तुम्ही आतापर्यंत काय तयार केले आहे?”