PAK vs BAN Shakib Al Hasan Threw Ball on Mohammed Rizwan: पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने १० विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बांगलादेशने पाकिस्तानचा पराभव केला आहे. पहिला कसोटी सामना बांगलादेशने जिंकत कसोटी मालिकेत आघाडी मिळवली. या सामन्यातील दुसऱ्या डावात पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने ५० धावा केल्या. पण त्याच्या या खेळीदरम्यान शकिब अल हसनने रिझवानवर चेंडू फेकून मारला.
रावळपिंडी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात एक घटना घडली. या सामन्याच्या शेवटच्या म्हणजेच ५व्या दिवशी अनेक तणावपूर्ण आणि नाट्यमय क्षण पाहायला मिळाले. खेळाच्या शेवटच्या दिवशी लंचच्या आधी, बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने असं काही केलं की पंचांना मध्यस्थी करावी लागली. शकीबने फलंदाजी करत असलेल्या मोहम्मद रिझवानच्या दिशेने चेंडू टाकला, जो कदाचित त्याला लागला, परंतु नशीबाने त्याला दुखापत झाली नाही.
PAK vs BAN: शकीबने रिझवानला फेकून मारला चेंडू
या सामन्याच्या दुसऱ्या डावातील ३३व्या षटकात शकीब अल हसनकडे चेंडू होता. तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होता, मात्र अखेरच्या क्षणी फलंदाजी करत असलेल्या मोहम्मद रिझवानने माघार घेतली. पण शकीब थांबला नाही आणि अनपेक्षितपणे त्याने चेंडू सरळ त्याच्या दिशेने टाकला. शकीबने तो चेंडू यष्टीरक्षक लिटन दासच्या दिशेने फेकला, जो रिझवानच्या डोक्याला लागला. रिझवान फलंदाजीसाठी तयार नव्हता आणि तो मागे बघत होता. त्याला शाकिब अल हसनच्या कृतीचा राग आला होता.
PAK vs BAN 1st Test: अंपायरने शकिबला दिली सक्त ताकीद
शाकिब अल हसनच्या या कृतीनंतर अंपायरिंग करणारे पंच रिचर्ड केटलबरो यांनी यावर आक्षेप घेतला आणि शकिब अल हसनला सक्त ताकीद दिली. मैदानावर असे वर्तन खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, पंचांनी घेतलेल्या आक्षेपानंतर, शकिबही काहीतरी बोलताना दिसला आणि पंचही त्याला काहीतरी निक्षून सांगत असल्याचे दिसत होते. दुसऱ्या डावात शाकिब अल हसनने कठीण परिस्थितीत संघासाठी अर्धशतक झळकावले आणि त्याने ८० चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. तर गोलंदाजीतही ३ विकेट घेत बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयात मोठी भूमिका बजावली.