PAK vs SL Final Match : आशिया चषकातील पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम लढत चांगलीच रोमहर्षक आणि अटीतटीची ठरली. या लढतीत श्रीलंकेने पाकिस्तानला धूळ चारत आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. श्रीलंकेने पाकिस्तानसमोर विजयासाठी १७१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ही धावसंख्या गाठणे पाकिस्तानी संघाला शक्य झाले नाही. २० षटकांमध्ये पाकिस्तानला अवघ्या १४७ धावा करता आल्या. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी नेत्रदीपक कामगिरी केली. वानिंदू हसरंगा आणि प्रमोद मदुशन यांनी केलेल्या कौशल्यापूर्ण गोलंदाजीमुळे श्रीलंकेला विजयापर्यंत पोहोचता आले.

श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या १७१ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आल्यानंतर पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. पाकिस्तानी संघाचा पहिला गडी बाबर आझमच्या रुपात बाद झाला. त्याने अवघ्या पाच धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी फलंदाजीसाठी आलेल्या फखर जमान याने निराशा केली. तो खातेदेखील खोलू शकला नाही. तो त्रिफळाचित झाला. तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या इफ्तिखार अहमद आणि सलामीवीर मोहम्मद रिझवान यांनी मैदानात चांगले पाय रोवले होते. दोघांनी ७१ धावांची भागिदारी केली. मात्र १४ व्या षटकात इफ्तिखार अहमद (३२) झेलबाद झाला.

हेही वाचा>>> शतक झळकावून कोहलीने सही केली अन् बॅटची किंमत थेट लाखोंमध्ये गेली; पाकिस्तानी फॅन म्हणतो “१ कोटी रुपये…”

अहमदनंतर पाकिस्तानचा एकही फलंदाज मैदानावर तग धरू शकला नाही. मोहम्मद नवाझ (६), खुशदिल शाह (२), आसिफ अली (०), शादाब खान (८) या मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. पाकिस्तानच्या १२० धावा झालेल्या असताना आठ गडी बाद अशी दयनीय स्थिती झाली. त्यामुळे १२ चेंडूंमध्ये पाकिस्तानसमोर ५१ धावांची गरज अशी स्थिती निर्माण झाली. शेवटी पाकिस्तानचे खेळाडू वीस षटकांत १४७ धावा करू शकले. परिणामी श्रीलंकेचा २३ धावांनी विजय झाला.

हेही वाचा >>>PAK vs SL Asia Cup 2022 : हे काय? पाकिस्तानी खेळाडूने केले चिटिंग? मैदानातच पंचासोबत…

याआधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. पहिल्या चार षटकांत दोन फलंदाज बाद झाल्यामुळे २३ धावांवर दोन गडी बाद अशी श्रीलंकेची स्थिती झाली. सलामीवीर कुसल मेंडिस खातंदेखील खोलू शकला नाही. तर पाथुम निसांकाने अवघ्या आठ धावा केल्या. दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या धनंजया डी सिल्वाने तुलनेने चांगला खेळ केला. त्याने २१ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या.

हेही वाचा >>> PAK vs SL Final Match : तो अवघा १९ वर्षांचा, पण श्रीलंकेच्या दिग्गजाला दाखवलं अस्मान; बघता बघताच दांडी गुल!

दनुष्का गुनाथिलका (१), कर्णधार दासून शनाका (२) यांनी निराशा केली. तर एकट्या भानुका राजपक्षेने अर्धशतकी खेळी करत ४५ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि ६ चौकार यांच्या मदतीने ७१ धावा केल्या. राजपक्षेच्या खेळीमुळे श्रीलंकेची धावसंख्या १७० पर्यंत पोहोचली. वानिंदू हसरंगाने राजपक्षेला उत्तम साथ दिली. त्याने ३२१ चेंडूंमध्ये ३६ धावा केल्या.

हेही वाचा >>> आशिया चषकातून भारत बाहेर पडल्यानंतर रोहित शर्मा काय करतोय? दुबईतील पंचतारांकित हॉटेलमधील फोटो आला समोर

गोलंदाजी विभागात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना बांधून ठेवण्यात काही प्रमाणात यश मिळवले. हरिस रौफने सर्वाधिक तीन बळी घेतले. तर नसीम शाह, शादाब खान, इफ्तिखार अहमद यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केलं. पाकिस्तानी गोलंदाजांच्या तुलनेत श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सरस कामगिरी केली. प्रमोद मदुशन याने बाबर आझम, इफ्तिखार अहमद, नसीम शाह या महत्त्वाच्या फलंदाजांना तंबूत पाठवले. त्याने एकूण चार बळी घेतले. तर वानिंदू हसरंगानेही मोहम्मद रिझवान, खुशदील शाह यांच्यासह एकूण तीन बळी घेतले. माहीश तिक्षाणाने एक तर करुणारत्नेने दोन बळी घेतले.