पाकिस्तानच्या मैदानावर तब्बल १० वर्षानंतर खेळणाऱ्या श्रीलंकेने यजमानांना टी २० मालिकेत धूळ चारली. तीन सामन्यांची टी २० मालिका श्रीलंकेने ३-० अशी जिंकून पाकिस्तानला व्हाईटवॉश दिला. पहिले दोन सामने गमावल्यानंतर पाकिस्तानच्या संघाला लाज वाचवण्यासाठी तिसरा सामना जिंकणे आवश्यक होते. पण तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानला १३ धावांनी पराभूत केले.

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १४७ धावा केल्या. ओशादा फर्नांडो याने ४८ चेंडूत ७८ धावांची दमदार खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ३ षटकार लगावले. या खेळीसह श्रीलंकेकडून टी २० पदार्पणात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करणारा खेळाडू ठरण्याचा बहुमान त्याने मिळवला. पण इतर फलंदाजांना मात्र फार काळ खेळपट्टीवर तग धरता आले नाही. त्यामुळे श्रीलंकेला दीडशतकी मजल मारणे शक्य झाले नाही. पाकिस्तानकडून मोहम्मद आमीरने ३ तर वहाब रियाझ आणि इमाद वासीमने प्रत्येकी १-१ बळी टिपला.

१४८ धावांच्या या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमान पहिल्या चेंडूवर बाद झाला. पण बाबर आझम आणि हॅरिस सोहेल यांनी चांगली भागीदारी रचली. हॅरिसने शानदार अर्धशतक झळकावले. तर बाबर आझमने २७ धावा केल्या. पण हे दोघे बाद झाल्यावर पाकचा डाव कोलमडला. त्यामुळे २० षटकात पाकला ६ बाद १३४ धावांपर्यंत मजल मारता आली.