टी२० वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामना होणार हे ठरताच मुंबई कोलंबो प्रवासाचं तिकीट १०,००० वरून ६०,००० वर जाऊन पोहोचलं आहे. आठवडाभराच्या वाटाघाटींनंतर तिढा सुटला असून रविवारी ठरल्याप्रमाणे ही लढत होणार आहे. या लढतीसाठी भारतातून मोठ्या प्रमाणावर चाहते श्रीलंकेसाठी रवाना होणार असल्याने मुंबई कोलंबो विमान प्रवासाच्या तिकिटांचे दर अव्वाच्या सव्वा पातळीवर गेले आहेत. पाकिस्तानचा संघ भारतात येत नसल्याने त्यांच्या लढती श्रीलंकेत होणार आहेत.
पाकिस्तानने आठवडाभर आधी भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या सरकारने क्रिकेट बोर्डाला अशी सूचना केली होती. या निर्णयामुळे आयसीसी तसंच प्रक्षेपणकर्त्या कंपनीचं मोठं नुकसान होणार होतं. पाकिस्तानने भूमिकेत बदल करावा यासाठी आठवडाभर वाटाघाटी झाल्या. आयसीसीचं एक पथक पाकिस्तानात दाखल झालं. त्यांनी पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांची भेट घेतली. बांगलादेशचे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम हेही इस्लामाबादमध्ये होते. चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही पाकिस्तानला ही लढत खेळावी अशी विनंती केली होती. युएईनेही भारताविरुद्धची लढत खेळावी असं आवाहन केलं होतं. भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घातल्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं मोठं आर्थिक नुकसान होणार होतं. तसंच भविष्यात आयसीसीच्या स्पर्धेच्या आयोजनाची संधीही मिळाली नसती. याव्यतिरिक्त पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणाऱ्या विदेशी खेळाडूंना एनओसी अर्थात ना हरकत प्रमाणपत्रही मिळणं कठीण झालं असतं.
दरम्यान ही लढत वेळापत्रकानुसार होणार असल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचं १७४ मिलिअन डॉलरचं एवढं प्रचंड नुकसान टळलं आहे. प्रक्षेपण हक्क, गेटमनी आणि अन्य प्रायोजक यांच्या माध्यमातून एवढा पैसा उभं राहणं अपेक्षित आहे.
पाकिस्तानात झालेल्या बैठकीला श्रीलंका क्रिकेट, बांगलादेश क्रिकेट बोर्ड, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीचं शिष्टमंडळ उपस्थित होतं. सुरक्षिततेच्या कारणास्तव बांगलादेशने भारतात खेळायला नकार दिला होता. बांगलादेशने त्यांच्या लढती श्रीलंकेत आयोजित करण्याची विनंती केली होती. आयसीसीने लॉजिस्टिक्सच्या मुद्यावरून ही मागणी फेटाळली होती. त्यानंतर बांगलादेशने गट बदलण्याची विनंती केली होती. आयसीसीने ही मागणीही अमान्य केली. आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला पुनर्विचार करण्यासाठी २४ तास दिले. मात्र त्यानंतरही बांगलादेशने भूमिका बदलली नाही. आयसीसीच्या बैठकीत १४-२ असं मतदान झालं. बांगलादेशला फक्त पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पाठिंबा मिळाला. अखेर बांगलादेशने टी२० वर्ल्डकपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. आयसीसीने बांगलादेशऐवजी स्कॉटलंडचा स्पर्धेत समावेश केला.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या सगळ्या गोष्टींचा विचार करून भारताविरुद्धच्या सामन्यावरचा बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला.
