पाकिस्तानचा संघ क्रिकेटच्या मैदानावर असल्यावर काही विचित्र किंवा आश्चर्यचकित घडताना पाहतोच. कधी झेल पकडण्यासाठी दोन खेळाडू एकत्र येतात, फिल्डिंग करताना एकमेकांवर आदळतात, तर कधी विचित्र रन आऊट. यामुळे पाकिस्तानी खेळाडूंचं हस होत असतं. यादरम्यान अंडर-१९ वर्ल्डकपमध्येही असंच दृश्य पाहायला मिळालं. क्रीझजवळ उभा असतानाही खेळाडू रनआऊट झाला आहे, ज्याचा व्हीडिओ आता जगभरात व्हायरल होत असून पाकिस्तान संघाला ट्रोल केलं जात आहे.

झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये सुरू झालेल्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाने इंग्लंडविरुद्ध पहिला सामना खेळला. या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत इंग्लंडला फक्त २१० धावांवर रोखलं. पण संघाच्या फलंदाजांमुळे मात्र पदरी निराशा पडली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या १७३ धावांमध्ये सर्वबाद झाला आणि इंग्लंडने सामना सहज ३७ धावांनी जिंकला.

पाकिस्तानची फलंदाजी अपयशी ठरली, पण सामना ज्या पद्धतीने संपला त्यावरून पुन्हा एकदा पाकिस्तानी खेळाडूंना ट्रोल केलं जात आहे. सामन्यातील ४७व्या षटकात ही घटना घडली. पाकिस्तानी फलंदाज मोमीन कमरने एक शॉट खेळला आणि धाव काढण्यासाठी गेला. दोन्ही फलंदाजांनी धाव घेतली. शॉट मारणारा मोमीन दुसऱ्या टोकाला क्रीजवर पोहोचला, पण दुसरा फलंदाज अली रझा असं काही केलं की सर्वच जण अवाक् झाले.

अली रझा वेळेत क्रीझजवळ पोहोचला होता, पण त्याची बॅट खाली ठेवण्यापूर्वी अचानक थांबला आणि चेंडूच्या दिशेने पाहू लागला. पण तोपर्यंत इंग्लंडचा यष्टीरक्षक-कर्णधार थॉमस रयूने चेंडू पकडला होता. रझा पुन्हा क्रीजवर धाव घेण्यापूर्वीच रयूने त्याला धावबाद केलं. रिप्ले पाहिल्यावर असं दिसून आलं की रझा स्वतःला थ्रो केलेला चेंडू लागू नये म्हणून थांबला होता. कदाचित त्याला असंही वाटत असेल की क्रीज इतकी जवळ आहे की, कीपर तो पकडण्यापूर्वीच तो क्रीजच्या आत जाईल. पण विकेटकीपरने मात्र वायूवेगाने चेंडू टिपत त्याला रनआऊट केलं.

अली रझा व मॉमिन ही १०व्या व ११व्या क्रमांकाचा जोडी होती आणि या दोघांसमोर ३८ धावांचं लक्ष्य होतं. पण फलंदाज विचित्र पद्धतीने धावबाद झाल्यानंतर सर्वच जण चकित झाले. या रनआऊटचा व्हीडिओ व्हायरल होत असून जगभरात पाकिस्तान क्रिकेटने आपली लाज काढली आहे.