आयपीएलच्या बाराव्या हंगामातील सामन्यांनी, आतापर्यंत चांगलाच जोर धरला आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमी या स्पर्धेची मोठ्या आतुरतेने वाट पाहतात. मात्र भारताचा शेजारी, पाकिस्तानने आयपीएल सामन्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलमुळे पाकिस्तानमधील क्रिकेटला धोका असल्याचं सांगत, पाकिस्तानने आयपीएलच्या सामन्यांचं प्रक्षेपण थांबवलं आहे. पाकिस्तानचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी या निर्णयची माहितती दिली. पंतप्रधान इम्रान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

“पाकिस्तानातील क्रिकेटला धोका पोहचवण्याचं काम भारताकडून केलं जात आहे. भारतामधील स्थानिक क्रिकेट स्पर्धा पाकिस्तानात दाखवण्यात आम्हाला काहीच अर्थ वाटत नाही. भारतीय वाहिन्यांनी, पाकिस्तान क्रिकेट लीग सामन्यांचं प्रक्षेपण मध्यावर थांबवलं होतं. त्यामुळे आयपीएलचे सामने पाकिस्तानात न दाखवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.” चौधरी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अवश्य वाचा – राहुल द्रविडचं प्रमोशन, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत वर्णी लागण्याची शक्यता

पुलवामा हल्ल्यात ४० केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. यानंतर भारताने सर्वच स्तरावर पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून पाकिस्तान सुपर लिग सामन्यांचं प्रक्षेपण थांबवण्याचा निर्णय भारतीय वाहिन्यांनी घेतला होता. त्यामुळे या बाबतीत आगामी काळात काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2019 : वानखेडेच्या कर्मचाऱ्यांसोबत धोनी-हरभजन-रैनाचं खास फोटोसेशन