भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटच्या मैदानावरील द्वंद्व आपल्या सर्वांनाच माहित आहे. दोन्ही संघांमध्ये कायमच हायव्होल्टेज लढती पाहायला मिळाल्या आहेत. या दोन्ही संघांमधील ही स्पर्धा केवळ मैदानातील कामगिरीमुळेच नव्हे, तर खेळाडूंची वक्तव्ये, हावभाव आणि मैदानाबाहेरील वादांमुळेही अनेकदा ठळकपणे दिसून येते. अलीकडेच, युवा पाकिस्तानी खेळाडू हसन नवाझने भारतीय गोलंदाजांवर जहाल टीका केली, जी आता व्हायरल होत आहे.
पाकिस्तान सुपर लीग २०२६ दरम्यान भारतीय गोलंदाजांविरुद्ध बोलणाऱ्या पाकिस्तानी फलंदाज हसन नवाझचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हसन नवाझला विचारण्यात आलं की, जगातील कोणत्या गोलंदाजाविरुद्ध त्याला सर्वाधिक धावा करायच्या आहेत. त्यावर उत्तर देताना त्याने भारताच्या गोलंदाजांचा उल्लेख केला.
हसन नवाझ उत्तरादाखल म्हणाला, “आम्ही नेहमी भारतीय संघाच्या गोलंदाजांविरुद्ध धावा करण्याचा विचार करतो. हे अगदी सोपं आहे, आम्हाला त्यांच्या प्रत्येक गोलंदाजाचा तिरस्कार वाटतो. देवाची इच्छा असेल आणि आम्हाला संधी मिळाली, तर भविष्यात आम्ही अधिकाधिक धावा करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.”
हसन नवाझने असंही म्हटलं की, भारताविरुद्ध खेळताना त्याला स्वाभाविकपणे अधिक प्रेरणा मिळते. मात्र, आतापर्यंत त्याला भारतीय संघाविरुद्ध फार मोठी कामगिरी करता आलेली नाही. महत्त्वाचं म्हणजे हसन नवाझ भारताविरुद्ध फक्त एकच सामना खेळला आहे. त्या सामन्यात तो केवळ ५ धावांवर बाद झाला होता.
हसन नवाझने २०२५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत त्याने २५ टी-२० सामने खेळले असून, त्यात दोन अर्धशतकं आणि एका शतकासह २०.७७ च्या सरासरीने आणि १५४.३९ च्या स्ट्राइक रेटने ४५७ धावा केल्या आहेत. दरम्यान, पाकिस्तान सुपर लीग २०२६ मधील त्याची कामगिरी तुलनेने सामान्य राहिली आहे. हसनने १० सामन्यांमध्ये केवळ दोन अर्धशतकांसह फक्त २९१ धावा केल्या आहेत.
आशिया चषक २०२५ दरम्यान दोन्ही संघांमधील वातावरण अधिक तापलं होतं. पाकिस्तानकडून भारताच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याचा निषेध म्हणून भारताने पाकिस्तानशी हस्तांदलोन करण्यास नकार दिला होता. नाणेफेकीदरम्यानही दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये हे चित्र पाहायला मिळालं होतं. यामुळे मैदानावरील परिस्थिती अधिक चिघळताना दिसली होती. दोन्ही संघांच्या खेळाडूंवर आयसीसीकडून कारवाईदेखील करण्यात आली होती.
