Hong Kong Sixes India vs Pakistan Match Result: हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत भारतीय संघाची सुरूवात अत्यंत खराब झाली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाने भारताचा ४ विकेट्सने पराभव केला आहे. अवघ्या ३.५ षटकांत पाकिस्तानने ८९ धावांचं लक्ष्य गाठलं आणि दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानकडून सलामीवीरांनी पहिल्या दोन षटकांतच सामना आपल्या बाजूने फिरवला होता. कृणाल पंड्याच्या पहिल्याच षटकात ५ षटकार खेचले गेले होते.
पाकिस्तानचा कर्णधार अब्बास आफ्रिदी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ आपल्या ६ षटकांत ५ गडी गमावून केवळ ८८ धावा करू शकला. पाकिस्तानने ८९ धावांचे हे लक्ष्य यशस्वीपणे गाठले आणि अवघ्या ३.५ षटकांत २ गडी गमावून ९१ धावा केल्या.
भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ षटकांत ५ विकेट्स गमावत ८८ धावा केल्या होत्या. सलामी जोडी राहुल त्रिपाठी व नितीश राणा मोठी फटकेबाजी करण्यात अपयशी ठरले. राहुलने ५ चेंडूत २ चौकारांसह ९ धावा केल्या, तर नितीश राणा १४ चेंडूत २ षटकार व एका चौकारासह १९ धावा करत बाद झाला. भारताच्या या ८८ धावांच्या धावसंख्येत शशांक सिंगचं मोठं योगदान आहे. शशांक सिंगने ११ चेंडूत २ चौकार व ५ षटकारांसब ४० धावा केल्या. तर राहुल तेवतिया व कृणाल पंड्या गोल्डन डकवर बाद झाले. तर टी नटराजनने २ चौकारांसह १२ धावा केल्या.
प्रत्युत्तरात ख्वाजा नाफे आणि कर्णधार अब्बास आफ्रिदी यांनी पाकिस्तान संघाला एक जबरदस्त सुरुवात करून दिली. कृणाल पंड्याने टाकलेल्या पहिल्याच षटकात अब्बास आफ्रिदीने सलग पाच षटकार झळकावले. त्याने अवघ्या ८ चेंडूंमध्ये ५ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने ३५ धावा केल्या. ख्वाजा नाफे १२ चेंडूंमध्ये ४१ धावा करून बाद झाला. त्यानंतर, अब्दुल समद ७ धावांवर नाबाद राहिला, तर इरफान खानने सामना जिंकण्यासाठी आपल्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. भारताचा पुढील सामना आता ३१ ऑक्टोबरला युएई संघाविरूद्ध होणार आहे.
