Pakistan vs Srilanka Highlights: टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पल्लेकल इथे झालेल्या लढतीत रोमहर्षक लढतीत पाकिस्तानने यजमान श्रीलंकेवर अवघ्या पाच धावांनी विजय मिळवला. पण सेमी फायनलमध्ये स्थान पटकावण्यासाठी २१३ धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला पाकिस्तानने १४७ धावांत रोखणं आवश्यक होतं. ते पाकिस्तानला जमलं नाही आणि त्यांचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. एकाच सामन्यात जिंकूनही त्यांच्या मनात हरल्याचीच भावना असेल. दरम्यान पाकिस्तान श्रीलंकेला रोखू न शकल्याने सरस रनरेटच्या बळावर न्यूझीलंडने सेमी फायनलमधलं स्थान पक्कं केलं आहे. इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे तीन संघ सेमी फायनलमध्ये पोहोचले आहेत. रविवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील विजेता संघ सेमी फायनलमध्ये स्थान पटकावेल. दरम्यान डोंगराएवढ्या लक्ष्यासमोर खेळताना श्रीलंकेचा कर्णधार दासून शनकाने ३१ चेंडूत ७६ तर पवन रत्नायकेने ३७ चेंडूत ५८ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. शनकाने शेवटच्या षटकात २८ धावा आवश्यक असताना चौकार आणि सलग तीन षटकार लगावले मात्र त्यानंतर शाहीन शहा आफ्रिदीने पुनरागमन केलं.
श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी २१३ धावांचा डोंगर सर करायचा होता. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला हवी तशी सुरूवात करता आली नाही. सलामीला आलेला पथुम निसंका अवघ्या ३ धावांवर माघारी परतला. तर कमिल मिशाराने २६ धावा केल्या. तर चरिथ असलंका २५ धावांवर माघारी परतला. शेवटी पवन रथनायकेने ४ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ५८ धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली.तर कर्धार दासून शनाकानेही अर्धशतक झळकावलं. पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. श्रीलंकेने हा सामना अवघ्या ५ धावांनी गमावला.
पाकिस्तानने केल्या २१२ धावा
या सामन्यात पाकिस्तानचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. पाकिस्तानकडून पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या सलामीवीर साहिबजादा फरहान आणि फखर जमान यांनी मिळून दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी विक्रमी १७६ धावा जोडल्या. फखर जमान ४२ चेंडूत ८४ धावा करून बाद झाला. तर साहिबजादा फरहानने ६० चेंडूत १०० धावा केल्या. त्यानंतर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पण पाकिस्तानने २० षटकांअखेर ८ गडी बाद २१२ धावा केल्या.
सेमीफायनलमध्ये जाणारे ३ संघ ठरले
या सामन्यात पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी होती. पण पाकिस्तानला या संधीचं सोनं करता आलेली नाही. श्रीलंकेने १४८ धावांचा पल्ला गाठताच न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरला. तर इंग्लंडने आधीच सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं होतं. यासह दक्षिण आफ्रिकेचा संघ देखील सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे. तर चौथ्या स्थानासाठी भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये निर्णायक सामना खेळवला जाणार आहे.
