उपांत्य फेरीतील पराभवाबाबत पाकिस्तानचा कर्णधार आझमचे मत

हसन अलीने मोक्याच्या क्षणी मॅथ्यू वेडचा झेल सोडला नसता, तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता, असे मत ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने व्यक्त केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाल्याने पाकिस्तानचे दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

१७७ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला अखेरच्या दोन षटकांत २२ धावांची गरज होती. पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहीन आफ्रिदीने टाकलेल्या १९व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन धावाच निघाल्या. तिसऱ्या चेंडूवर वेडने मोठा फटका मारला. चेंडू सीमारेषेवरील हसन अलीच्या हातात गेला, पण त्याला झेल पकडता आला नाही. वेडने पुढील तिन्ही चेंडूंवर षटकार मारत ऑस्ट्रेलियाला सामना जिंकवून दिला.

‘‘आम्ही या सामन्यात काही झेल सोडले आणि याचा आम्हाला फटका बसला. विशेषत: वेडचा झेल पकडला गेला असता, तर सामन्याचा निकाल बहुधा वेगळा असता. आम्ही या चुकांमधून धडा घेणे गरजेचे आहे,’’ असे सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत आझम म्हणाला.

काही काळाने त्याने हसनची पाठराखण केली. ‘‘हसनने याआधी त्याच्या गोलंदाजीने आम्हाला अनेक सामने जिंकवले आहेत. खेळाडूंकडून चुका होतात. त्याला झेल सोडला याचे दु:ख आहे. लोक त्याच्यावर टीका करतील. मात्र, आम्ही त्याच्या पाठीशी आहोत,’’ असे आझमने नमूद केले.

सामन्यापूर्वी रिझवान अतिदक्षता विभागात

दुबई : पाकिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवानला उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी दोन दिवस अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. छातीचा संसर्ग असतानाही त्याने सामन्यात खेळण्याचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती पाकिस्तान संघाचे डॉक्टर नजीब यांनी दिली. ‘‘छातीचा संसर्ग झाल्याने ९ नोव्हेंबरला रिझवानला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो दोन दिवस अतिदक्षता विभागात होता. त्याच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाल्यामुळे त्याला सामन्यात खेळण्यासाठी परवानगी देण्यात आली,’’ असे नजीब यांनी सांगितले. आझमनेही त्याच्या सलामीच्या साथीदाराच्या लढवय्या वृत्तीचे कौतुक केले. रिझवानने या सामन्यात ५२ चेंडू्ंत ६७ धावांची झुंजार खेळी केली.

वॉर्नरचे कृत्य खिलाडूवृत्तीला अशोभनीय -गंभीर

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानचा फिरकीपटू मोहम्मद हाफिजच्या एका दोन टप्पी चेंडूवर षटकार मारला. मात्र, ही कृती भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला आवडली नाही. ‘‘वॉर्नरचे कृत्य खिलाडूवृत्तीला अशोभनीय होते,’’ असे गंभीरने ‘ट्वीट’ केले आहे. तसेच त्याने याबाबत भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे मत विचारले. अश्विनने ‘आयपीएल’मध्ये काही वर्षांपूर्वी नॉन-स्ट्राइकवरील जोस बटलरला चेंडू टाकण्यापूर्वी क्रीजबाहेर आल्यामुळे धावचीत केले होते. गंभीरच्या ‘ट्वीट’ची  अश्विानने पाठराखण केली. ‘‘वॉर्नरने जे केले ते योग्य होते, तर मी (अश्विन) जे केले तेसुद्धा योग्य होते. तसेच त्याने केलेले कृत्य चूक असल्यास माझे कृत्यही चूक होते, असे बहुधा गंभीरला म्हणायचे आहे,’’ असे अश्विन ‘ट्वीट’मध्ये म्हणाला.