West Indies vs Pakistan 2nd Test: पाकिस्तानचा संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे.दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने दमदार विजयाची नोंद केली होती. वेस्ट इंडिजचा संघ या मालिकेत १-०ने आघाडीवर आहे. पाकिस्तानने हा सामना ९० धावांनी गमावला होता, पण गोलंदाजीत मोहम्मद अब्बासने दमदार गोलंदाजी केली होती. या सामन्यातील दोन्ही डावात मिळून त्याने ८ गडी बाद केले होते. अशी कामगिरी केल्यानंतर, कुठल्याही गोलंदाजाला पुढच्याच सामन्यात डच्चू देण्याची शक्यता ही नाहीच्या बरोबर असते. पण पाकिस्तानच्या कर्णधाराने ८ गडी (६३-३ गडी, २२-५ गडी) बाद करणाऱ्या गोलंदाजाला पुढच्याच सामन्यात डच्चू दिला आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना त्रिनिदादच्या क्विन्स पार्कच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पाकिस्तानचा संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. ज्यावेळी बाबर आझमने पाकिस्तानची प्लेईंग ११ सांगितली, त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जो गोलंदाज गेल्या सामन्यात पाकिस्तानसाठी हिरो ठरला होता, त्या मोहम्मद अब्बासला या सामन्यातून डच्चू देण्यात आला आहे. या निर्णयावरुन बाबर आझमला ट्रोल केलं जात आहे.
बाबर आझम काय म्हणाला?
हा सामना बाबर आझमसाठी खास आहे. कारण तो पाकिस्तानसाठी कर्णधार म्हणून १५० वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. पण या खास सामन्यात तो वेगळ्याच कारणामुळे ट्रोल होत आहे. नाणेफेकीच्या वेळी बाबर आझमने संघात बदल करण्यामागचं कारण सांगितलं आहे. तो म्हणाला, “आम्ही हवामान आणि परिस्थितीनुसार संघात काही बदल केले आहेत. ज्यात २ नवोदित खेळाडूंचा समावेश आहे.” तसेच मोहम्मद अब्बासला संघाबाहेर करण्यामागचं कारण सांगताना तो म्हणाला, ” मी आधीच सांगितलं की, परिस्थितीमुळे आम्ही संघात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी एका फिरकी गोलंदाजाला संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे.” या सामन्यासाठी प्लेईंग ११ मध्ये मोहम्मद अब्बासच्या जागी उबैद शाहला संघात स्थान देण्यात आलं आहे.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११:
पाकिस्तान: अब्दुल्ला शफिक, बाबर आझम (कर्णधार), अझान ओवेस, इमाम-उल-हक, सलमान आगा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), ओवेस जफर, अली उस्मान, साजिद खान, मोहम्मद अली, उबेद शाह
वेस्ट इंडिज: आमिर जांगू, शे होप (यष्टीरक्षक), तेगनारायण चंद्रपॉल, ब्रँडन किंग, कावेम हॉज, जस्टिन ग्रीव्ह्स, रोस्टन चेस (कर्णधार), केमार रोच, जोमेल वॉरिकन, शामर जोसेफ, जेदन सील्स
