Fatima Sana Fined By ICC: Shafali Verma Sendoff Controversy: आशिया चषक २०२६ मध्ये भारत-पाकिस्तान सामना चांगलाच रंगला होता. भारताने पाकिस्तानला प्रथम अवघ्या ५६ धावांवर सर्वबाद केलं होतं आणि नंतर ८.४ षटकांत ७ विकेट्सने विजय मिळवला होता. या सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी करताना पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने शफाली वर्माला दिलेला सेंडऑफ तिला चांगलात महागात पडला असून तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
भारत-पाकिस्तान महिला आशिया चषक सामन्यात भारतीय सलामीवीर शफाली वर्माला बाद केल्यानंतर केलेल्या आक्रमक सेलिब्रेशनसाठी पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनावर कारवाई करण्यात आली. शनिवारी दुबईत झालेल्या या सामन्यातील प्रकारासाठी सनाला तिच्या मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला असून, तिच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंटही जोडण्यात आला आहे.
भारताच्या डावातील दुसऱ्याच षटकात हा प्रकार घडला. फातिमा सनाने शफालीला बाद केल्यानंतर सेलिब्रेशन करताना तिला पॅव्हिलियनमध्ये परत जाण्याचा इशारा केला. शफालीने फातिमाच्या गोलंदाजीवर सरळ फटका मारण्याच्या प्रयत्नात तिच्या हातात सोपा झेल दिला होता. त्यानंतर फातिमाने केलेल्या या इशाऱ्याने सामनाधिकाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मैदानी पंच निमाली परेरा आणि शथिरा जाकीर जेसी, तिसरे पंच रोकेया सुलताना आणि चौथे पंच रबाब अहसान यांनी या प्रकाराबद्दल फातिमा सनावर कारवाई केली. सामनाधिकारी सुप्रिया राणी दास यांच्यासोबत झालेल्या सुनावणीदरम्यान फातिमाने आपली चूक मान्य केली.
फातिमा सनाने ICCच्या आचारसंहितेतील कलम २.५चा भंग केल्याचं आढळून आलं. या नियमानुसार आंतरराष्ट्रीय सामन्यात एखाद्या फलंदाजाला बाद केल्यानंतर त्याचा अपमान करणारी भाषा, कृती किंवा हावभाव करणं अथवा त्याला आक्रमक प्रतिक्रिया देण्यास प्रवृत्त करणाऱ्या कृतींवर कारवाई केली जाते. विशेष म्हणजे, गेल्या २४ महिन्यांतील फातिमा सनाचा हा दुसरा गुन्हा आहे. त्यामुळे तिच्या खात्यातील डिमेरिट पॉइंट्सची संख्या आता दोन झाली आहे.
समालोचक विवेक राजदान यांनीही फातिमा सनाच्या सेलिब्रेशनवर टीका केली होती. पाकिस्तानचा संघ अवघ्या ५५ धावांवर ऑलआऊट झाला होता. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही पाकिस्तानची आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या आहे. शफाली वर्माला बाद केल्यानंतर फातिमा सनाने केलेल्या सेलिब्रेशनवर राजदान यांनी प्रश्न उपस्थित केला. राजदान म्हणाले, “ठीक आहे, तुम्ही तिला मैदानाबाहेर जाण्याचा मार्ग दाखवत आहात. पण तुमच्या संपूर्ण संघाने मिळून फक्त ५५ धावा केल्या आहेत आणि आता तुम्ही शफाली वर्माला मैदानाबाहेर जाण्याचा इशारा करत आहात.”
भारताच्या फिरकी गोलंदाजीविरूद्ध पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या ५५ धावांवर सर्वबाद झाला होता आणि दुसऱ्या डावात भारताने ८.४ षटकांत विजय मिळवत ७ विकेट्सने सहज विजय मिळवला होता.
