Pakistan Captain Fatima Sana World Record in T20I: टी-२० इतिहासात आता एक नवा विश्वविक्रम रचला गेला आहे.पाकिस्तान महिला संघाची कर्णधार फातिमा सनाच्या स्फोटक फलंदाजीने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. सध्या पाकिस्तानचा महिला संघ टी-२० विश्वचक २०२६ची तयारी करत आहे. यादरम्यान पाकिस्तान आणि झिम्बाब्वे महिला संघांमध्ये टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील सामन्यादरम्यान फातिमा सनाने मोठा विक्रम आपल्या नावे केला.

पाकिस्तानची कर्णधारा फातिमाने झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या महिला टी-२० सामन्यात अवघ्या १५ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून इतिहास घडवला आहे. महिला टी-२० क्रिकेटमधील हे सर्वात जलद अर्धशतक आहे. कराची येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, २४ वर्षीय फातिमा सनाने फलंदाजीला उतरताच झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. तिने अवघ्या १५ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण करून पूर्वीचा विक्रम मोडला. सनाने या सामन्यात सर्वात जलद अर्धशतकासह १९ चेंडूत १० चौकार व २ षटकारांच्या मदतीने ६२ धावांची खेळी केली.

महिलांच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम सोफी डिव्हाईन, फिबी लिचफिल्ड आणि ऋचा घोष यांच्या नावावर संयुक्तपणे होता, ज्यांनी प्रत्येकी १८ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं. आता फतिमा सना हिने १५ चेंडूत अर्धशतक झळकावत पहिलं स्थान गाठलं आहे. फातिमाचा हा वर्ल्ड रेकॉर्ड फक्त टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांपुरता मर्यादित नसून तिने महिलांच्या टी-२० क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतकाच्या विक्रमाची बरोबरीही केली. यापूर्वी हा पराक्रम २०२२ मध्ये वॉरविकशायरसाठी मेरी केलीने आणि या वर्षी न्यूझीलंडच्या सुपर स्मॅश स्पर्धेत लॉरा हॅरिसने केला होता.

पाकिस्तानसाठी सर्वात जलद टी-२० आंतरराष्ट्रीय अर्धशतकाचा विक्रम निदा दारच्या नावावर होता, जिने २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २० चेंडूंत अर्धशतक झळकावलं होतं. आता हा विक्रम फातिमा सनाने आपल्या नावावर केला आहे.

पाकिस्तान-झिम्बाब्वे तिसरा टी-२० सामना

प्रथम फलंदाजी करताना, १७व्या षटकात फातिमा सना फलंदाजीला आली तेव्हा पाकिस्तानची धावसंख्या ४ बाद १५२ धावा होती. त्यानंतर फातिमा सनाने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई करायला सुरूवात केली. तिने मिशेल मावुंगाच्या गोलंदाजीवर चौकार मारून आपलं खातं उघडलं आणि त्यानंतर कुडझाई चिगोराच्या षटकात सलग चार चौकार ठोकून सामन्याचं चित्रच पालटलं.

डावाच्या १९ व्या षटकात फातिमाने नोमवेलो सिबांडाच्या गोलंदाजीवर तर कहर केला. या षटकात तिने ४, ४, ६, ६ आणि ४ अशा २४ धावा कुटल्या. अवघ्या १४ चेंडूंमध्ये ४८ धावा करणाऱ्या फातिमाने शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेत आपले ऐतिहासिक अर्धशतक पूर्ण केलं.

यानंतर सनाने १९ चेंडूंमध्ये नाबाद ६२ धावा करून डाव संपवला. यादरम्यान तिने १० चौकार आणि २ षटकार मारले. तिच्या या स्फोटक खेळीमुळे पाकिस्तानने ४ गडी गमावून २२३ धावा केल्या, जी महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही संघाची दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.