पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश स्पर्धेत बाबरला धाव घेण्यापासून रोखण्यावरून स्टीव्हन स्मिथवर टीका झाली होती. आता ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानात आहे. या खेपेस पाकिस्तानचा कर्णधार सलमान अघा बाबरच्या मुद्यावरून चर्चेत आला आहे.

टी२० वर्ल्डकपच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानात दाखल झाला आहे. या दौऱ्यात ते तीन टी२० सामने खेळणार आहेत. मालिकेच्या निमित्ताने कर्णधारांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी पाकिस्तानचा कर्णधार सलमान अघाला बाबर आझमविषयी विचारण्यात आलं. त्यावर सलमानने काढलेले उद्गार सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बाबरविषयी विचारलं असता सलमान म्हणाला, ‘माझी अशी इच्छा आहे की मी पत्रकार परिषदेला यावं आणि त्यामध्ये बाबर आझमबद्दल एकही प्रश्न विचारला जाऊ नये. त्याला फलंदाजी करू द्या’, असं उद्गार पाकिस्तानचा कर्णधार सलमान अघाने काढले. ‘संघात बाकी १४ खेळाडू आहेत. त्यांच्याबद्दलही विचारू शकता. हा एक सांघिक खेळ आहे’, असं काहीशा नाराज सलमानने सांगितलं.

यंदा बाबर आझमने बिग बॅश स्पर्धेत पदार्पण केलं. मात्र त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. ११ सामन्यात त्याने २०२ धावा केल्या. त्याची सरासरी आणि त्याहून जास्त स्ट्राईक रेट (१०३.०६) टीकेचा विषय झाला. बाबरसारख्या खेळाडूकडून सिडनी सिक्सर्सला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र पहिल्या हंगामात बाबर अपयशी ठरला. एका सामन्यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथने बाबरला एकेरी धाव घेण्यापासून रोखलं. बाबर यामुळे चिडला. पुढच्या षटकात स्मिथने ३२ धावा चोपून काढल्या. बाबर पुढचे काही दिवस नाराज होता. सिक्सर्सचा कर्णधार मॉइझेस हेन्रिकेला यासंदर्भात विचारण्यात आलं. तो म्हणाला, ‘ऑस्ट्रेलियाची क्रिकेट खेळण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. आमच्याकडे अशा गोष्टी होत असतात. बाबरला हे नवीन असावं. आम्ही त्याच्याशी बोललो आहोत. आता तो मुद्दा राहिलेला नाही’.

दरम्यान टी२० वर्ल्डकपसाठी निवड झालेल्या संघात बाबरची निवड झाली आहे. ‘बाबरची अलीकडची कामगिरी फारशी चांगली नसली तरी तो अनुभवी खेळाडू आहे आणि त्याचा संघाला फायदा होईल’, असं सलमानने सांगितलं. ‘ऑस्ट्रेलियात त्याने धावा केल्या नसतील पण तो काळजीचा मुद्दा नाही. पाकिस्तान क्रिकेटला बाबरने दिलेलं योगदान सर्वांसमोर आहे’.

३१वर्षीय बाबरने ६१ टेस्ट, १४० वनडे आणि १३६ टी२० सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्याने पाकिस्तानच्या नेतृत्वाची धुराही सांभाळली आहे. टी२० प्रकारात कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा करणे अपेक्षित असतं. स्ट्राईक रेटच्या बाबतीत बाबर पिछाडीवर पडला आहे. या कारणामुळेच बाबर आणि मोहम्मद रिझवानला संघातून डच्चू देण्यात आला होता. मात्र आता बाबरने संघात पुनरागमन केलं आहे.

बांगलादेशने टी२० वर्ल्डकपमधून माघार घेतली होती. सुरक्षिततेच्या मुद्यावरून बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिला. बांगलादेशला पाठिंबा म्हणून पाकिस्तानचा संघ माघार घेण्याच्या विचारात होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी यासंदर्भात सरकारशी चर्चा सुरू आहे असं म्हटलं होतं. यादरम्यान टी२० वर्ल्डकपसाठी पाकिस्तानने संघ जाहीर केला. पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत होणार आहेत.