Salman Agha Mike Hesson Fight Video: पाकिस्तान आणि नामिबिया यांच्यातील सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या डगआऊटमध्ये कोच व कर्णधार यांच्यातील वादाचा व्हीडिओ समोर आला आहे. पाकिस्तान संघाने नामिबियाचा १०२ धावांनी पराभव करत सुपर-८ साठी संघ पात्र ठरला आहे. या सामन्यात साहिबजादा फरहानने शतकी खेळी साकारत संघाला २०० धावांपर्यंत नेलं. यासह गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.

पाकिस्तानचा संघ सुपर-८ फेरीत दाखल झाला असला तरी संघाच्या तंबूत असलेला तणाव स्पष्टपणे दिसून आला. १८ फेब्रुवारीला आजा कोलंबोमध्ये नामिबियाविरुद्धचा ‘करो या मरो’ सामना पाकिस्तानने सहज जिंकला आणि २०२६ टी-२० वर्ल्ड कपमध्ये पुढील फेरी गाठली. मात्र विजय मिळूनही प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यात मैदानाबाहेर वाद झाल्याचं चित्र दिसलं.

डगआऊटमध्ये माईक हेसन व सलमान आघामध्ये वाद

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हीडिओमध्ये प्रशिक्षक माईक हेसन आणि कर्णधार सलमान अली आघा यांच्यात सामन्याच्या स्थितीवरून मतभेद झाल्याचे दिसून आले. डावाच्या १४व्या षटकापूर्वी दाखवलेल्या दृश्यांमध्ये, बाद झाल्यानंतर डगआउटमध्ये बसलेल्या आघाच्या दिशेने कोच गेले. प्रशिक्षकांनी केलेल्या वक्तव्यावर आघा नाराज झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. रागाच्या भरात त्याने पाण्याची बाटली जमिनीवर आपटली. या कृतीमुळे हेसनही चकित झाले. यानंतर हेसन यांनी रागाने बोट दाखवत अजून काहीतरी ३-४ शब्द सलमानला बोलताना दिसले, हे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालं.

पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझम हा या वादाच्या वेळी आघाच्या शेजारीच बसलेला होता. मात्र तो संपूर्ण प्रसंगात शांत होता आणि त्याने कोणताही हस्तक्षेप यादरम्यान केला नाही. चाहत्यांनी या व्हीडिओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही चाहते म्हणत आहेत, बाबरला फलंदाजी न दिल्याने कर्णधार नाराज होता.

नामिबियाविरूद्ध सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत १९९ धावांचा भक्कम डोंगर उभारला. साहिबजादा फरहानने अवघ्या ५८ चेंडूत नाबाद १०० धावांची शतकी खेळी साकारली. कर्णधार सलमान अली आघाने २३ चेंडूत ३८ धावा केल्या, तर शादाब खानने २२ चेंडूत ३६ धावांचं योगदान दिलं. नामिबियाकडून जॅक ब्रेसेल याने दोन विकेट्स घेतल्या. २०० धावांच्या पाठलागात नामिबियाचा डाव ९७ धावांतच आटोपला. पाकिस्तानकडून उस्मान तारिकने ३.३ षटकांत केवळ १६ धावा देत चार विकेट्स घेत भेदक गोलंदाजी केली.