टी२० वर्ल्डकप स्पर्धेत ढिसाळ आणि सर्वसाधारण कामगिरी करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडूंना दंडाला सामोरं जावं लागणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. १५ सदस्यीय संघाला मिळून सुमारे १८,००० अमेरिकन डॉलर्स एवढा दंड ठोठावण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाला सेमी फायनल फेरीत प्रवेश करता आला नाही. सुपर८ फेरीत त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. आयसीसीतर्फे आयोजित सलग चौथ्या स्पर्धेत पाकिस्तान संघाला सेमी फायनलचा टप्पा गाठता आलेला नाही. यामुळे संघातील खेळाडूंवर कारवाई करण्यात आली आहे.

शिस्तभंग किंवा वर्तनासाठी हा दंड नसून, स्पर्धेतील सुमार आणि ढिसाळ कामगिरीसाठी आहे असं बोर्डाने स्पष्ट केलं आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध खेळणार नाही असा पवित्रा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतला होता. मात्र आयसीसीच्या मध्यस्थीनंतर त्यांनी भारताविरुद्ध खेळण्याचा निर्णय घेतला. भारताने वर्चस्व कायम राखत ६१ धावांनी विजय मिळवला. भारताविरुद्धच्या पराभवानंतरच दंडाची कल्पना देण्यात आली होती. सेमी फायनलमध्ये धडक मारल्यास दंड माफ करण्यात येईल असंही बोर्डाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र पाकिस्तानही सुपर८ फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला.

पाकिस्तानने प्राथमिक फेरीचा टप्पा ओलांडला. सुपर८ फेरीत न्यूझीलंडविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाली. हॅरी ब्रूकच्या वादळी शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने त्यांना नमवलं. न्यूझीलंडने श्रीलंकेवर मोठा विजय मिळवला. यामुळे पाकिस्तानला शेवटच्या लढतीत श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय मिळवणं क्रमप्राप्त होतं. त्यांनी दोनशेपल्याड धावसंख्या उभारली. मात्र सेमी फायनल प्रवेशासाठी श्रीलंकेला १४७ धावांत रोखणं गरजेचं होतं. पाकिस्तानला ते जमलं नाही.

आशिया चषक फायनलच्या लढतीत पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना जगभरातील टी२० लीगमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही दिवसातच हा निर्णय बदलण्यात आला. त्यामुळे पाकिस्तानचे खेळाडू बिग बॅश स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाले.

दंडाची कारवाई होणार असली तरी पाकिस्तानच्या काही खेळाडूंसाठी स्पर्धा चांगली ठरली. सलामीवीर साहिबजादा फरहानने स्पर्धेत दोन शतकी खेळी साकारल्या. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. एका स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही फरहानच्या नावावर आहे. विचित्र अॅक्शन असणाऱ्या उस्मान तारीकच्या गोलंदाजीची सर्वत्र चर्चा झाली. श्रीलंकेविरुद्ध सामन्याचा अपवाद वगळता त्याने चांगली गोलंदाजी केली.