Pakistan Demands Boycott ENG vs PAK 2nd Test: पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने दमदार विजयाची नोंद केली. आता दुसरा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू आहे. सामन्यातील पहिल्या दिवशी पाकिस्तानने दमदार कामगिरी केली. पण हा सामना वेगळ्याच कारणामुळे चर्चेत राहिला. सामन्यातील पहिल्या दिवशी लंचच्या वेळी इंग्लंडच्या ब्रॉडकास्टर्सने पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांच्या मुलांची मुलाखत दाखवली. या मुलाखतीवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आक्षेप घेतला असून सामना रद्द करण्याची धमकी दिली.

क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, पहिल्या दिवशी लंच ब्रेक होण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्काय स्पोर्ट्ससोबत संपर्क साधला आणि या मुलाखतीवर आक्षेप घेतला होता. यासह जर ही मुलाखत दाखवण्यात आली तर, पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकेल असा प्लॅन देखील केला होता. पण असं काहीच झालं नाही.

स्काय स्पोर्ट्सने दखल घेत ही मुलाखत त्यावेळी प्रक्षेपित केली नाही. ही मुलाखत नंतर प्रक्षेपित करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू पुन्हा मैदानात उतरले. स्थानिक वेळेनुसार पाकिस्तानचे खेळाडू २ वाजून ४० मिनिटांनी खेळण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले.

माध्यमातील वृत्तानुसार, इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल एथरटन यांनी लॉर्ड्स कसोटी सुरू होण्याआधी, सकाळी सुलेमान आणि कासिम सोबत चर्चा केली होती. स्काय स्पोर्ट्सकडून या मुलाखतीचं प्रमोशन देखील करण्यात आलं होतं. पण पीटीव्हीने ही मुलाखत दाखवण्यास पाठ फिरवली. पाकिस्तानमध्ये या मालिकेचे प्रसारण करण्याचे हक्क पीटीव्हीकडे आहेत.

नेमकं कारण काय?

स्काय स्पोर्ट्सवर देण्यात आलेल्या या मुलाखतीत इम्रान खान यांच्या मुलांनी देशाचे माजी पंतप्रधान आणि सरकार यांच्यातील वागणुकीवर चर्चा केली. यादरम्यान त्यांनी असा दावा देखील केला, की त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. इम्रान खान गेल्या ३ वर्षांपासून तुरुंगात आहेत. त्यांच्या बहिणीने असा दावा देखील केला की, त्यांना टॉर्चर केलं जात आहे.