Pakistan Cricket Board Post For Fielding Coach On Linkedin: पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाचा मुख्य प्रशिक्षक सर्फराज अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुलला पदावरुन काढून टाकलं आहे. यासह ७ खेळाडूंना घरी पाठवण्यात आलं आहे. हे प्रकरण चर्चेत असताना पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने Linkedin वर शेअर केलेली एक पोस्ट सध्या तुफान चर्चेत आहे. गेल्या महिन्यात क्षेत्ररक्षण प्रशिक्षक शेन मॅकडरमॉटने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बऱ्याच दिवसांपासून ही जागा रिकामी आहे. ही जागा भरून काढण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चक्क Linkedin वर पोस्ट शेअर केली आहे.
पाकिस्तानचा संघ आपल्या फलंदाजी, गोलंदाजीसाठी कमी आणि क्षेत्ररक्षणासाठी जास्त चर्चेत असतो. पाकिस्तानच्या संघात एकापेक्षा एक खेळाडू आहेत, जे कठीण झेल तर घेतच नाहीत. पण सोपा झेलही कठीण बनवतात आणि सोडून देतात. याऊलट सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू पायाने ढकलून देतात. त्यामुळे जगातील उत्तम क्षेत्ररक्षण प्रशिक्षकही पाकिस्तानला प्रशिक्षण देण्यास नकार देतात. जे येतात तेही काही वर्षांत संघाची साथ सोडून निघून जातात.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अपेक्षा काय?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जी पोस्ट शेअर केली आहे, त्यात प्रशिक्षक कसा असावा आणि त्यांच्या अपेक्षा काय हे देखील लिहिलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला असा प्रशिक्षक हवा आहे, जो संघाचं क्षेत्ररक्षण सुधारण्यास मदत करेल. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कमीत कमी ५ वर्षांचा अनुभव असावा. यासह उमेदवाराने याआधी कुठल्याही राष्ट्रीय संघाला, फ्रँचायझीला किंवा मग आंतरराष्ट्रीय खेळाडूला प्रशिक्षण दिलेलं असावं. यासह तो लेव्हल २ क्रिकेट प्रशिक्षक असावा. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर ठेवण्यात आली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया….
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केलेल्या या पोस्टवर ५०० हून अधिक लोकांनी कमेंट केली आहे. एका युझरने कमेंट करत लिहिले की, “आधी चांगली टीम तरी बनवा, मग प्रशिक्षकाचा विचार करा.” तर आणखी एका युझरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची खिल्ली उडवत लिहिले की, “तुम्ही प्रशिक्षकाचा शोध घेण्याऐवजी, नवीन पाकिस्तानचा संघ का तयार करत नाही?”, तर आणखी एका युझरने लिहिले की, “मला हा जॉब करायचा आहे, मी जाँटी ऱ्होड्ससारखा क्षेत्ररक्षण करतो.” अशा अनेक मजेशीर कमेंट या पोस्टवर करण्यात आल्या आहेत.
