India vs Pakistan Match: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेला येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा स्पर्धेतील पहिला सामना अमेरिकेविरुद्ध होणार आहे. तर १५ फेब्रुवारीला भारत – पाकिस्तान सामना होणार आहे. क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण पाकिस्तानने स्पर्धा सुरू होण्याआधीच या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे. या स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात आले आहे. पण पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना देखील कोलंबोत खेळवला जाणार आहे. पण पाकिस्तानने हा सामना खेळण्यास नकार दिला आहे. दरम्यान पाकिस्तानने जर हा सामना खेळण्यास नकार दिला, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं किती नुकसान होईल? जाणून घ्या.
आयसीसीच्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक कमाई करून देणारा कोणता सामना असेल, तर तो भारत – पाकिस्तान सामना आहे. या सामन्यातून आयसीसीला २५ करोड डॉलर म्हणजेच २२०० कोटी रुपयांहून अधिकची रक्कम. त्यामुळे जर पाकिस्तानने हा सामना खेळण्यास नकार दिला, तर मोठं नुकसान होऊ शकतं.भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आधी द्विपक्षीय मालिकांमध्ये देखील आमनेसामने येत होते. पण दोन्ही देशातील सीमांतर्गत वादांमुळे पाकिस्तानच्या खेळाडूंवर भारतात येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येत असतात.
याआधी भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. पण त्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानात खेळण्यासाठी जाण्यास नकार दिल्याने, दोन्ही देशातील सामने न्यूट्रल वेन्यू वर खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वर्ल्डकप स्पर्धेतील पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.
पीसीबीचं किती नुकसान होणार?
जर हा सामना रद्द झाला, तर ब्रॉडकास्टर्सचं खूप मोठं नुकसान होणार आहे. या स्पर्धेचे ब्रॉडकास्टिंग राईट्स जियो हॉटस्टारकडे आहेत. त्यामुळे जियो हॉटस्टारचं मोठं नुकसान होऊ शकतं. जर पाकिस्तानचा संघ आपल्या निर्णयावर अडून राहिला, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं कोटींचं नुकसान होऊ शकतं. माध्यमातील वृत्तानुसार, सामना रद्द झाल्यास जाहिरातीमुळे होणारं नुकसान हे २०० ते २५० कोटींच्या घरात असणार आहे. या मोठ्या सामन्यादरम्यान १० सेकंदाच्या जाहिरातीची किंमत ४० लाख रूपये इतकी असते. हा सामना न खेळणं पाकिस्तानला महागात पडू शकतं. एका सामन्यासाठी होणारा खर्च हा २२०० कोटींहून अधिक आहे. तर पाकिस्तानची वर्षाची कमाई ३.५५ कोटी डॉलर इतकी आहे. त्यामुळे सामना रद्द करणं हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला परवडणारं नाही.

