लाहोर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी भारतीय संघ आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नसल्याची भूमिका स्पष्ट केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ‘पीसीबी’ने आशियाई क्रिकेट समितीची (एसीसी) तातडीची बैठक बोलवण्याची मागणी केली आहे.

मंगळवारी झालेल्या ‘बीसीसीआय’च्या सर्वसाधारण सभेनंतर शहा यांनी पुढील वर्षी आशिया चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही आणि ही स्पर्धा त्रयस्थ केंद्रावर खेळविण्यात यावी, असे वतक्व केले होते. त्यावर भारतीय संघ पाकिस्तानात न आल्यास, पाकिस्तानही पुढील वर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत खेळणार नाही, अशी ‘पीसीबी’ने भूमिका घेतली आहे.

जय शहा ‘एसीसी’चे अध्यक्षही आहेत. त्यांचे वक्तव्य हे आशियाई आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फूट पाडणारे आहे, असे ‘पीसीबी’चे म्हणणे आहे. आता या संदर्भात ‘एसीसी’ची तातडीची बैठक बोलाविण्यात यावी अशी मागणी ‘पीसीबी’ने केली आहे. पाकिस्तानही २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळणार नाही. त्याचबरोबर २०२४ ते २०३१ या कालावधीत भारतात होणाऱ्या ‘आयसीसी’च्या कुठल्याही स्पर्धेत आम्ही सहभागी होणार नाही, असा इशाराही ‘पीसीबी’ने दिला आहे.

तोडगा निघणारच!

पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या आशिया चषकाचा मुद्दा ‘आयसीसी’च्या पुढील महिन्यात होणाऱ्या कार्यकारी समितीच्या बैठकीत ‘बीसीसीआय’ व ‘पीसीबी’कडून उपस्थित करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. ही बैठक मेलबर्न येथे होणार आहे. ‘एसीसी’मधील सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान शिवाय आशिया चषक स्पर्धाच होऊ शकत नाही. त्यामुळे हा प्रश्न या बैठकीत निकालात काढला जाईल.