Pakistan Cricket Match Fixing Allegations: PCB Seizes Players Mobiles: पाकिस्तान क्रिकेट संघ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) पुन्हा एकदा मॅच-फिक्सिंगने घेरल्याची चर्चा सुरू झाली आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा १९४ धावांनी पराभव झाल्यानंतर PCBने तब्बल सात खेळाडूंना संघातून वगळण्याचा निर्णय घेतला.
मोहम्मद रिझवान, सलमान अली आघा, इमाम-उल-हक, अली उस्मान, खुर्रम शहजाद, आमिर जमाल आणि मोहम्मद अवैस झफर यांना संघाबाहेर करण्यात आलं. इतकंच नाही, तर मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांनाही त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं. या सर्व चर्चांदरम्यान आता पाकिस्तान क्रिकेट संघात मॅच फिक्सिंग झाल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.
पाकिस्तानने सात नव्या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला असून, यापैकी पाच खेळाडूंनी अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं नाही. सईम अय्युब आणि अब्दुल्ला फझल हे दोन अनुभवी फलंदाज संघात परतले आहेत. तर रझाउल्लाह खान आणि मोहम्मद इम्रान हे वेगवान गोलंदाज, अष्टपैलू, डावखुरा फिरकीपटू अराफात मिन्हास, यष्टिरक्षक साद बैग आणि डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद इम्रान ज्युनियर यांचा नव्या खेळाडूंमध्ये समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेटमध्ये करण्यात आलेले हे मोठे बदल केवळ मैदानावरील खराब कामगिरीमुळे झालेले नाहीत. या कारवाईमागे ‘क्रिकेटपेक्षा अधिक’ कारणं असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेटमध्ये मॅच-फिक्सिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकरणाबाबत संबंधित पक्षांकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) तसेच PCBकडेही स्पष्टीकरण मागण्यात आलं. मात्र, ७२ तासांहून अधिक काळ उलटूनही त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नसल्याचं, टाईम्स ऑफ इंडियाने वृत्तात म्हटलं आहे.
मात्र, PCBचे मीडिया आणि डिजिटल कम्युनिकेशन्स संचालक आमिर मीर यांनी याप्रकरणी सार्वजनिक निवेदन जारी केलं आहे. ते म्हणाले, “शिस्त आणि वर्तनासंदर्भातील मीडिया रिपोर्ट्सनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अंतर्गत शिस्तभंगाची चौकशी सुरू केली आहे. सध्या या प्रकरणाचा अंतर्गत स्तरावर आढावा घेतला जात आहे. PCB अशा प्रकरणांवर आपल्या ठरलेल्या प्रक्रियेनुसार कारवाई करते. बोर्डाच्या नियमांनुसार ही प्रक्रिया सुरू असून, संबंधित सर्व व्यक्तींच्या बाजूचा योग्य विचार केला जात आहे.”
पाकिस्तानमधील 365 Newsच्या वृत्तानुसार, काही खेळाडूंचे मोबाईल फोन PCBकडे जमा करण्यात आले असून अंतिम कसोटी संपेपर्यंत ते बोर्डाच्याच ताब्यात राहणार आहेत. मात्र, कोणत्या खेळाडूंचे फोन जप्त करण्यात आले आहेत, याची माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आलेली नाही. तसेच, हे फोन ताब्यात घेण्यामागचं नेमकं कारण PCBने अद्याप जाहीर केलेलं नाही.
PCBचे अध्यक्ष मोहसिन नक्वी म्हणाले, “आमच्यासाठी मालिकेतील प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. एखादा खेळाडू कामगिरी करत नसेल, तर त्याचा पर्याय शोधण्याशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग उरत नाही. या बदलांचा उद्देश खेळाडूंना संघाच्या शर्यतीतून बाहेर करणं नाही, तर केवळ त्यांची जागा बदलणं हा आहे.”
