Ajnkya Rahane On Pakistan Cricket: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. स्पर्धेतील पहिला सामना ७ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा सामना नेदरलँडविरूद्ध होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ अजूनही श्रीलंकेला जाण्यासाठी रवाना झालेला नाही. त्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनी स्पर्धेतून माघार घेऊ अशा पोकळ धमक्या दिल्या आहेत. पण पाकिस्तान क्रिकेट संघाकडे टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत बहिष्कार टाकण्याइतका दम नाही, असं वक्तव्य भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने केलं आहे.
बांगलादेशने, आम्ही भारतात खेळण्यासाठी येणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांनी सामन्याचं ठिकाण बदलून हवं अशी मागणी आयसीसीकडे केली होती. पण आयसीसीने या मागण्या फेटाळून लावल्या. त्यामुळे बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशऐवजी स्कॉटलंडला ही स्पर्धा खेळण्याची संधी देण्यात आली आहे. बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर करणं हे, पाकिस्तानला मुळीच पटलं नव्हतं. बांगलादेशचे सामने पाकिस्तानात खेळवण्यात यावे असा प्रस्तावही पाकिस्तानने आयसीसीसमोर ठेवला होता. पण आयसीसीने हे सर्व फेटाळून लावलं. त्यामुळे पाकिस्तान बहिष्काराची भाषा करत आहे. मोहसिन नक्वी यांनी आपला निर्णय कळवण्यासाठी आयसीसीकडे २ फेब्रुवारीपर्यंतची मुदत मागितली आहे.
दरम्यान पाकिस्तानबाबत बोलताना माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने रोखठोक वक्यव्य केलं आहे. अजिंक्य रहाणे म्हणाला, “मला वाटत नाही, ते असं काही करतील. त्यांच्यात तेवढा दम नाही. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. पाकिस्तानचा संघ स्पर्धेतील पहिला सामना नेदरलँडविरूद्ध खेळणार आहे. पाकिस्तानने या स्पर्धेसाठी आपला १५ सदस्यीय संघ देखील जाहीर केला आहे. असं असतानाही, मोहसिन नव्वी यांनी पाकिस्तानचा संघ टी-२० वर्ल्डकप खेळणार की नाही हे अजूनही अनिश्चित असल्याचं सांगितलं आहे. माध्यमातील वृ्त्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डने मोहसिन नक्वी यांच्या निर्णयाची वाट न पाहताच, पाकिस्तानला टी-२० वर्ल्डकपसाठी श्रीलंकेला पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, पाकिस्तानचा संघ सोमवारी २ फेब्रुवारीला कोलंबोसाठी रवाना होणार आहे.
आगामी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत पाकिस्तानचा संघ पहिल्या सामन्यात ७ फेब्रुवारीला नेदरलँडविरूद्ध भिडणार आहे. त्यानंतर १० फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यात यूएसएचा सामना करणार आहे. त्यानंतर १५ फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. तर १८ फेब्रुवारीला पाकिस्तानचा सामना नामिबीयाविरूद्ध होणार आहे.

