Pakistan Cricket Team Fined By ICC: इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत पाकिस्तानचा संघ इंग्लंडला जोरदार आव्हान देणार असं वाटलं होतं. पण तिन्ही सामन्यातील सुरुवातीच्या ५ डावात पाकिस्तानला २०० धावा देखील करता आल्या नव्हत्या. त्यानंतर शेवटच्या कसोटीतील शेवटच्या डावात पाकिस्तानने ४०० धावा केल्या. पण या तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. यासह पाकिस्तानने ही मालिका ३-० ने गमावली. आता पाकिस्तानचा संघ मायदेशात परतला आहे. पण ही मालिका संपल्यानंतर आयसीसीने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे.
मालिकेतील तिसरा कसोटी सामना बर्मिंगहॅममध्ये पार पडला. या सामन्यात पाकिस्तानला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर आयसीसीने पाकिस्तानवर स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई केली आहे. आयसीसीकडून पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंच्या मॅच फीवर ५०-५० टक्के दंड आकारण्यात आला आहे. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतून ११ पॉईंट वजा करण्यात आले आहेत. यासह विजयाच्या सरासरीतही घट झाली आहे. पाकिस्तानने या सामन्यातील दोन्ही डावात मिळून ८ षटकं कमी टाकली. निर्धारित वेळेत पूर्ण षटकं न टाकल्याने पाकिस्तानवर ही कारवाई करण्यात आली आहे.
पाकिस्तानची स्थिती आता दुष्काळात तेरावा महिना अशीच काहीशी झाली आहे. कारण खेळाडूंच्या मॅच फी मधून ५०-५० टक्के रक्कम वजा करण्यात आली आहे. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत तळाशी असताना आणखी ११ गुण कमी करण्यात आले आहेत. या सामन्याआधी पाकिस्तानचे गुण १६ होते. जे आता कमी झाल्यानंतर ५ वर पोहोचले आहेत. तर विजयाची सरासरी ४.६३ वर घसरली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत जाण्याच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडला आहे.
आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्ट २.२२ नुसार, जर एखाद्या संघाने निर्धारित वेळेत षटकं पूर्ण केली नाहीत, तर त्या संघावर कारवाई केली जाते. मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने १ डाव आणि १०३ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने १९४ धावांनी विजय मिळवला होता. तर मालिकेतील तिसरा सामना जिंकून इंग्लंडने ८ गडी राखून विजय मिळवला. यासह मालिका ३-० ने आपल्या नावावर केली.
