इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत २०११ साली मॅच फिक्सिंगप्रकरणी दोषी ठरलेला पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमीरविषयी पाकचा माजी गोलंदाज अब्दुल रझाकने धक्कादायक खुलासा केला आहे. शाहीद आफ्रिदीने कानाखाली मारल्यानंतर मोहम्मद आमीरने मॅच फिक्सिंगची कबुली दिली होती, असा दावा रझाकने केला आहे.

पाकिस्तान संघ २०११ साली इंग्लंड दौऱ्यावर असताना मॅच फिक्सिंगचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पाक संघातील सलमान बट, मोहम्मद आमीर आणि मोहम्मद आसीफ हे तिघे खेळाडू दोषी ठरले होते. मोहम्मद आमीर आता पाक संघात परतला असून वर्ल्डकपमधील संघात त्याचा समावेश आहे. बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने पाच विकेट्सही घेतल्या होत्या.

पाकचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाकने जीएनएन या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमीरविषयीचा किस्सा सांगितला. “इंग्लंड दौऱ्यावर असताना आफ्रिदीने मला खोलीतून बाहेर जायला सांगितले. यानंतर मी खोलीबाहेर गेलो आणि दरवाजा बंद झाला. काही वेळाने मला कानशिलात लगावल्याचा आवाज आला. यानंतर आमीरने मॅच फिक्सिंगची कबुली दिली होती”, असे रझाकने सांगितले. त्यावेळी पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले, असेही रझाकने म्हटले आहे.

“पीसीबीने त्यावेळी आयसीसीकडे जाण्याऐवजी तिन्ही खेळाडूंना पाकमध्ये परत पाठवले पाहिजे होते. यानंतर त्यांच्यावर एक वर्षांसाठी बंदी घातली पाहिजे होती. पण असं न करता पीसीबीने स्वत:ची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी आयसीसीकडे जाण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणामुळे जगभरात पाकिस्तानची प्रतिमा मलिन झाली”, असे रझाकने म्हटले आहे.

इंग्लंडमधील सामन्यांमध्ये सलमान बट जाणून बुजून बाद होत असल्याचे मला वाटत होते. मी आफ्रिदीलाही हा प्रकार सांगितला होता. त्यावेळी आफ्रिदीने मला सांगितले की हा माझ्या मनातील गैरसमज आहे. यानंतर वेस्ट इंडिजमधील टी- २० वर्ल्डकपमध्येही मी बटसोबत फलंदाजी करत असताना तो मुद्दामून सुमार कामगिरी करत असल्याचे मला वाटत होते, असेही रझाकने सांगितले.