Pakistan Cricket Board: पाकिस्तानचा क्रिकेटपटू हमजा नजर मोठ्या अडचणीत सापडला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हमजा नजरवर २ वर्षांची बंदी घातली आहे. यादरम्यान त्याच्यावर दंड देखील आकारण्यात आला आहे. ही बंदी घातल्यानंतर तो केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट नव्हे, तर देशांतर्गत क्रिकेटमधील कुठल्याही स्पर्धेत खेळू शकणार नाही. काय आहे प्रकरण? त्याच्यावर बंदी घालण्याचं नेमकं कारण काय? जाणून घ्या.
काय आहे कारण?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, पीसीबी मार्फत व्हिसासाठी अर्ज करत असताना हमजा नजरने चुकीची माहिती दिली होती. त्यानंतर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. ज्यावेळी चौकशी करण्यात आली, त्यावेळी असं लक्षात आलं की, त्याने अपूर्ण आणि चुकीची माहिती दिली होती. त्याने खऱ्या गोष्टी लपवणारी आणि दिशाभूल करणारी माहिती दिली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने समिती तयार केली होती. यादरम्यान पीसीबीने हमजाला आपली बाजू मांडण्याची संधीही दिली होती.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हमजा नजरवर कुठल्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत किंवा देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होण्यावर २ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय १० लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बोर्डाकडून ३ सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. यासह हमजाला आपली बाजू मांडण्याची संधी देखील देण्यात आली होती. त्याचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, उपलब्ध माहितीची समीक्षा केल्यानंतर, आणि संबधित परिस्थितींचा विचार केल्यानंतर समितीने आपला अहवाल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे सुपूर्द केला आहे.
कोण आहे हमजा नजर?
हमजा नजर हे नाव पाकिस्तान क्रिकेटमध्ये अजूनतरी फारसं चर्चेत नाही. २७ वर्षीय हमजाला भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. आतापर्यंत १६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने ७४८ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना त्याने २६ गडी बाद केले आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने १५ सामन्यातील १३ डावांत फलंदाजी करताना १९२ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना त्याेन १८ गडी बाद केले आहेत.
