गेल्या काही दिवसांपासून भारताचा माजी कर्णधार आणि तडाखेबाज फलंदाज विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल मोठी चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या तीन वर्षांपासून विराटनं एकही शतक झळकावलेलं नाही. सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यात देखील विराट कोहलीला आपल्या कामगिरीने छाप पाडता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर विराटची कामगिरी ही जशी टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरू लागली आहे, तशीच त्याच्या कोट्यवधी चाहत्यांसाठी देखील ही चिंतेची बाब ठरली आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासोबतच अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी विराटच्या समर्थनार्थ भूमिका मांडल्या आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमच्या एका ट्वीटची यासंदर्भात जोरदार चर्चा झाली.

बाबर आझमनं नुकतंच एक ट्वीट करून विराटची पाठराखण केली होती. एकदिवसीय क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असणाऱ्या बाबर आझमने विराटसोबतचा फोटो ट्विटरवरुन पोस्ट केला. टी-२० विश्वचषकाच्या सामन्यादरम्यानच्या या फोटोमध्ये कोहली आणि बाबर आझम एकत्र चालताना दिसत आहेत. या फोटोला बाबरने एक सुंदर कॅप्शन देखील दिली आहे. विराटला पाठिंबा देण्यासाठी बाबरने, “ही वेळही निघून जाईल. खंबीर राहा,” असा संदेश या फोटोसोबत लिहिलाय.

विराट कोहलीवर टीका करणाऱ्यांना शोएब अख्तरने सुनावले; म्हणाला, “तुम्ही फक्त…”

दरम्यान, बाबर आझमनं केलेल्या ट्वीटनंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी यानं त्यासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. समा टीव्हीच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. “बाबरनं केलेली कृती उल्लेखनीय अशीच आहे. क्रिकेट असो वा इतर कोणताही खेळ, तो दोन देशांमधले संबंध वृद्धींगत करण्यासाठी मदतच करतो. राजकारण्यांपेक्षा खेळाडू ही गोष्ट अधिक उत्तमरीत्या करू शकतात. काही खेळाडू तेच करत आहेत”, असं शाहीज या ट्वीटबाबत बोलताना म्हणाला आहे.

“बाबरनं या ट्वीटमधून एक सुंदर संदेश दिला आहे. मला माहीत नाही की विराटकडून त्यावर अद्याप काही प्रतिक्रिया आलेली आहे किंवा नाही. आत्तापर्यंत विराटनं त्यावर प्रतिक्रिया द्यायला हवी होती. बाबरच्या ट्वीटला जर विराटनं प्रतिक्रिया दिली, तर ती एक खूप चांगली बाब ठरेल. पण मला वाटत नाही असं काही होईल”, असं देखील शाहीद आफ्रिदी म्हणाला आहे.

कोहलीला आश्वासनांची गरज नाही! ; भारतीय संघातील स्थानाबाबत कर्णधार रोहितचे स्पष्टीकरण

दरम्यान, विराट कोहलीच्या खराब फॉर्मनंतर देखील भारताचा कर्णधार रोहीत शर्माने विराटची पाठराखण केली आहे. “कोहली प्रदीर्घ काळ देशाचे प्रतिनिधित्व करत असून त्याने अनेक सामने खेळले आहेत. तो उत्कृष्ट फलंदाज आहे. त्यामुळे आम्ही त्याला संघातील स्थान सुरक्षित असल्याचे आश्वासन देण्याची गरज नाही. मी यापूर्वीही म्हणालो होतो की, खेळाडूंची कामगिरी वर-खाली होत असते. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंनाही चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. भारताला असंख्य सामने जिंकवून दिलेल्या कोहलीसारख्या खेळाडूला पुन्हा सूर गवसण्यासाठी केवळ एक-दोन डाव लागतात”, असं रोहीत म्हणाला आहे.