Pakistan Cricket Team ICC Trophy Drought Fakhar Zaman Statement: पाकिस्तान संघ सध्या रसातळाला पोहोचला आहे. गेल्या ९ वर्षांत संघाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश मिळालेलं नाही. याशिवाय इतर स्पर्धांमधील व द्विपक्षीय मालिकेतील संघाच्या कामगिरीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उभारलं जात आहे. याचदरम्यान आता पाकिस्तानचा फलंदाज फखर जमान याने संघावर आयसीसीचं विजेतेपद जिंकण्याचा दबाव असल्याची कबुली दिली आहे.

आयसीसीची मोठी ट्रॉफी जिंकण्याची पाकिस्तानची प्रतीक्षा आता दहाव्या वर्षात पोहोचण्याच्या मार्गावर आहे. फखर जमानने पीटीआयशी बोलताना सांगितलं, “आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याची जबाबदारी आमच्यावर संघ म्हणून आहे आणि देशाची मोठ्या आंतरराष्ट्रीय विजेतेपदाची प्रतीक्षा संपवण्यासाठी आम्ही सविस्तर चर्चाही केली आहे.”

पाकिस्तानला आयसीसीचं विजेतेपद जिंकण्याची पुढील संधी २०२७च्या वनडे विश्वचषकात मिळणार आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पाकिस्तानने २०१७मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर अद्याप कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. त्यानंतर २०२२च्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानला विजेतेपदाची सर्वाधिक जवळची संधी मिळाली होती; मात्र मेलबर्नमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला.

फखर जमान पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करता, तेव्हा लोक तुमच्यावर अधिक प्रेम करतात. पण कामगिरी खराब झाली, तर त्यांची निराशा होणं स्वाभाविक आहे. वरिष्ठ असो किंवा युवा, प्रत्येक खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आणि आपल्या खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो.”

फखर जमान म्हणाला, “पाकिस्तानला बऱ्याच काळापासून आयसीसीचं विजेतेपद जिंकता आलेलं नाही, त्यामुळे लोक निराश होणं स्वाभाविक आहे. आम्ही चांगली कामगिरी करतो, तेव्हा चाहते आमच्यावर प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव करतात, याचीही आम्हाला जाणीव आहे. एखादं विजेतेपद जिंकल्यानंतर संपूर्ण देशाला जो आनंद होतो, तो उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरी गाठल्यानंतर मिळणाऱ्या आनंदापेक्षा वेगळा असतो.”

“आम्ही ही गोष्ट खूप गांभीर्याने घेत आहोत. आम्ही आमच्याकडून सर्वोत्तम प्रयत्न करू,” असंही फखरने स्पष्ट केलं. “विश्वचषकासाठी योग्य संघरचना आतापासूनच तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे, तिरंगी मालिकेत सहभागी होणाऱ्या आमच्या बहुतांश खेळाडूंनी नुकतेच देशांतर्गत क्रिकेट खेळलं आहे,” असं फखर म्हणाला.

तो पुढे म्हणाला, “प्रथम श्रेणी क्रिकेट खेळल्यानंतर ५० षटकांच्या क्रिकेटशी जुळवून घेणं तुलनेने सोपं असतं. मात्र, टी-२० क्रिकेटमधून थेट वनडे क्रिकेटमध्ये जुळवून घेणं कधीच सोपं नसतं. आनंदाची बाब म्हणजे, सर्व खेळाडू देशांतर्गत हंगाम खेळून आले आहेत आणि सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.”