Pakistan vs England Test Series 2026 Squad Changes: पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून कसोटी मालिका संघाने गमावली आहे. इंग्लंडने सुरूवातीचे दोन्ही कसोटी सामने जिंकत मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. कसोटी सामन्यांमधील सततच्या पराभवानंतर पाकिस्तान संघात मोठा भूकंप झाल्याचं पाहायला मिळत आहे, संघात पुढील कसोटीसाठी तब्बल ७ बदल करण्यात आले आहेत, याशिवाय कोचिंग स्टाफमधील मुख्य प्रशिक्षक व गोलंदाजी प्रशिक्षकांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीनंतर, संघ व्यवस्थापनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या कसोटीतील १९४ धावांच्या पराभवासह ही मालिका ०-२ अशा फरकाने गमावल्यानंतर, पाकिस्तानने तिसऱ्या आणि अंतिम कसोटीपूर्वी सात खेळाडूंना संघातून रिलीज केलं आहे. याव्यतिरिक्त, कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक सर्फराज अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं आहे.
पाकिस्तानने तिसऱ्या कसोटीसाठीच्या संघात एकूण सात नवीन खेळाडूंचा समावेश केला आहे, ज्यामध्ये पाच अशा खेळाडूंचा समावेश आहे ज्यांनी यापूर्वी कसोटी सामनाच खेळलेला नाही. या गटात सैम अय्युब आणि अब्दुल्ला फझल यांचा समावेश असून, या दोघांनाही कसोटी क्रिकेटचा अनुभव अत्यंत मर्यादित आहे. दरम्यान, पाच खेळाडूंना पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान मिळालं आहे.
संघातून वगळण्यात आलेल्या सात खेळाडूंमध्ये मोहम्मद रिझवान, इमाम-उल-हक, सलमान आघा, अली उस्मान, आमीर जमाल, ओवेस झफर आणि खुर्रम शहजाद यांचा समावेश आहे. रिझवान आणि इमाम यांच्या कामगिरीबाबत आणि फिटनेसबाबत आधीच प्रश्न उपस्थित केले जात होते. पाकिस्तानने तिसऱ्या कसोटीसाठी संघात सामील केलेल्या पाच नवीन खेळाडूंमध्ये अराफत मिन्हास, मोहम्मद इम्रान ज्युनियर, साद बेग, मोहम्मद इम्रान रंधावा आणि रझाउल्ला यांचा समावेश आहे. यापैकी कोणीही अद्याप पाकिस्तानसाठी कसोटी क्रिकेट खेळलेले नाही.
चालू कसोटी मालिकेत पाकिस्तानचा कोच बदलला
पाकिस्तानने आपल्या कोचिंग स्टाफमध्येही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. टी-२० आणि वनडे संघांचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन आता कसोटी संघासोबत काम करतील. त्यांच्यासह, ‘व्हाईट-बॉल’ संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक ॲशली नॉफके यांचाही कसोटी संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला एका डावाने आणि १०३ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर, लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही संघाचा १९४ धावांनी पराभव झाला. सलग दोन सामने गमावल्यामुळे पाकिस्तानने ही मालिका आधीच गमावली असून, आता अंतिम सामन्यात आपली प्रतिष्ठा सावरण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तिसरी आणि अंतिम कसोटी ९ सप्टेंबरपासून एजबॅस्टन येथे खेळवली जाणार आहे. मालिका हातातून निसटलेली असली, तरी नवीन संघ आणि नवीन प्रशिक्षक-समूहासह स्वतःला सिद्ध करण्याची संधी पाकिस्तानला या सामन्यातून मिळणार आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानचा नवा संघ
बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला फजल, अराफात मिन्हास. अजान अवैस, मोहम्मद अब्बास, मोहम्मद अली, मुहम्मद इमरान, मोहम्मद इमरान ज्युनियर, मुहम्मद गाजी गौरी (विकेटकीपर), रजा उल्लाह, साद बेग (विकेटकीपर), सॅम अय्युब, साजिद खान, सौद शकील, शान मसूद आणि उबैद शाह
