पाकिस्तान-इंग्लंड कसोटी मालिका :पाकिस्तानला विजयासाठी २६३ धावांची गरज | Pakistan England Test Series Pakistan vs England test match amy 95 | Loksatta

पाकिस्तान-इंग्लंड कसोटी मालिका :पाकिस्तानला विजयासाठी २६३ धावांची गरज

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ओली रॉबिनसनसह नवीन चेंडूने मोर्चा सांभाळला.

पाकिस्तान-इंग्लंड कसोटी मालिका :पाकिस्तानला विजयासाठी २६३ धावांची गरज
पाकिस्तान-इंग्लंड कसोटी मालिका

रावळिपडी : पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात विजयासाठी ३४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रविवारी चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत २ बाद ८० धावसंख्येपर्यंत मजल मारली. पाकिस्तानला सामन्याच्या अखेरच्या दिवशी विजयासाठी ९० षटकांत २६३ धावांची आवश्यकता आहे. तर, तीन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्यासाठी इंग्लंडला आठ बळी मिळवण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानकडून इमाम उल हक (४३) आणि सौद शकील (२४) खेळत आहेत.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ओली रॉबिनसनसह नवीन चेंडूने मोर्चा सांभाळला. संघाला याचा फायदाही झाला. त्यांना अब्दुल्लाह शफीक आणि कर्णधार बाबर आझम यांना बाद करण्यात यश आले. शफीकला रॉबिनसनने बाद केले. तर, बाबरला (४) स्टोक्सने माघारी धाडले. या दरम्यान अझर अलीला दुखापत झाल्याने तो माघारी परतला. यामुळे पाकिस्तानची अवस्था ही २ बाद २५ अशी झाली. यानंतर इमाम आणि शकील यांनी सावध फलंदाजी केली. त्यापूर्वी, इंग्लंडने चौथ्या दिवसाच्या चहापानापूर्वी आपला दुसरा डाव घोषित करताना पाकिस्तानला ३४३ धावांचे आव्हान दिले. पहिल्या डावात ७८ धावांची आघाडी घेणाऱ्या इंग्लंडने दुसरा डाव ७ बाद २६४ धावसंख्येवर घोषित केला.

दिवसाच्या सुरुवातीला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विल जॅक्सने १६१ धावा देत सहा बळी मिळवले. पण, पाकिस्तानने फलंदाजीस अनुकूल अशा खेळपट्टीवर पहिल्या डावात ५७९ अशी धावसंख्या उभारली. इंग्लंडने दुसऱ्या डावात आपली पहिल्या डावातील लय कायम राखली. त्यांच्याकडून जो रूटने ७३ धावा केल्या, तर पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या हॅरी ब्रूकने ६५ चेंडूंत ८७ धावांची खेळी केली. सलामीवीर जॅक क्राउलीने ५० धावांची खेळी केली. यापूर्वी, पाकिस्तानने दिवसाच्या सुरुवातीला ७ बाद ४९९ धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यांच्या आगा सलमानने ६७ चेंडूंत ५३ धावा केल्या. त्याने जाहिद महमूदसह ५७ धावांची भागीदारी केली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 00:14 IST
Next Story
पुणे मॅरेथॉनमध्ये इथियोपियाच्या धावपटूंची मक्तेदारी; पुरुष विभागात लेटा गुटेटा, तर महिलांमध्ये देरार्टु केबेडे विजेते