Pakistan vs Namibia: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ फेरीत प्रवेश करणारे ८ संघ ठरले आहेत. स्पर्धेतील ३५ वा सामना पाकिस्तान आणि नामिबिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. नामिबियाचा संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला होता. तर पाकिस्तानने टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ मध्ये प्रवेश करण्यासाठी हा सामना जिंकणं महत्वाचं होतं. या सामन्यात पाकिस्तानने पहिल्या डावात फलंदाजी करताना १९९ धावांचा डोंगर उभारला. २०० धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नामिबियाचा डाव अवघ्या ९७ धावांवर आटोपला. यासह पाकिस्तानने हा सामना १०२ धावांनी आपल्या नावावर केला.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून सलामीला आलेला सईम अयुब अवघ्या १४ धावा करत माघारी परतला. तर कर्णधार सलमान अली आघाने २३ चेंडूत ३८ धावांची खेळी केली. ख्वाजा नफाय ५ चेंडूत ५ धावा करून माघारी परतला. शेवटी शादाब खान आणि सलामीला आलेल्या साहिबजादा फरहानने महत्वपूर्ण भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या १९९ धावांवर पोहोचवली. साहिहबजादा फरहानने ५८ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने १०० धावांची खेळी केली. तर शादाब खानने २२ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ३६ धावांची खेळी केली.

नामिबियाला हा सामना जिंकण्यासाठी २०० धावांचा डोंगर सर करायचा होता. या धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या लॉरेन स्टीनकॅम्पने २३ धावांची खेळी केली. तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. नामिबियाचा डाव अवघ्या ९७ धावांवर आटोपला.

धावांचा बचाव करताना उस्मान तारिकने ३.३ षटकात १ निर्धाव षटक टाकत सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर शादाब खानने ४ षटकात १९ धावा खर्च करून ३ गडी बाद केले. तर सलमान मिर्झा आणि मोहम्मद नवाझने प्रत्येकी १-१ गडी बाद केला. या विजयासह ग्रुप ए मधून भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ सुपर ८ साठी पात्र ठरले आहेत. तर अमेरिका आणि नेदरलँड्सचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.