पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दोन दिवसांत आपल्या तीन अव्वल खेळाडूंना कठोर शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तान सुपर लीग दरम्यान झालेल्या अनेक वादांनंतर, पीसीबी आपल्या खेळाडूंवर कडक कारवाई करत आहे. एका वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टसाठी नसीम शाहवर आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शाहीन शाह आफ्रिदीवर मोठा दंड आकारल्यानंतर, पीसीबीने आता स्टार फलंदाज फखर जमानवर सामन्यांची बंदी घातली आहे.
पीसीबीने संघाचा आक्रमक फलंदाज फखर जमानवर दोन सामन्यांची बंदी घातली आहे. जमानवर बॉल टेम्परिंगचे आरोप झाल्यानंतर पाकिस्तान बोर्डाने हा निर्णय घेतला असून, तो पीएसएलचे दोन सामने खेळू शकणार नाही.
पीएसएल २०२६ च्या सहाव्या सामन्यात लाहोर कलंदर्स आणि कराची किंग्स यांच्यात घडलेल्या एका घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला. सामन्याच्या शेवटच्या षटकाच्या आधी, पंचांनी शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील लाहोर कलंदर्स संघाला बॉल टेम्परिंग केल्याबद्दल पाच धावांचा दंड ठोठावला आणि चेंडू बदलण्यात आला. परिणामी, कराची किंग्सच्या शेवटच्या षटकातील १४ धावा केवळ नऊ धावांवर आल्या आणि त्यांनी तीन चेंडूंमध्येच सामना जिंकला.
सामन्यानंतर, लाहोरचा कर्णधार शाहीन आफ्रिदीने चेंडू छेडछाडीच्या घटनेबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचं सांगितलं. पण या घटनेचे व्हिडिओ लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामध्ये २०व्या षटकाच्या सुरुवातीपूर्वी शाहीन, हरिस रौफ आणि फखर जमान चेंडूबाबत चर्चा करताना दिसत होते. यावेळी, फखर एका हाताने चेंडू पकडून दुसऱ्या हाताने झाकताना दिसला. हे पंचांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्याला थांबवलं, ज्यामुळे चेंडू बदलावा लागला आणि दंड आकारण्यात आला.
बॉल टेम्परिंगची ही घटना आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर, लाहोर कलंदर्स आणि पीसीबी या दोघांवरही तीव्र टीका झाली. फखर जमानची सुनावणी पीएसएलच्या समितीसमोर झाली, जिथे संघाचा कर्णधार शाहीन आफ्रिदी आणि व्यवस्थापक समीन राणा हे देखील उपस्थित होते.
सुनावणीदरम्यान, फखरने आरोप नाकारले, परंतु सामनाधिकारी रोशन महानामा यांनी पुराव्यांची तपासणी करून त्याला पीएसएल आचारसंहितेच्या कलम २.१४ अंतर्गत दोषी ठरवले, ज्यामध्ये किमान एक आणि कमाल दोन सामन्यांच्या निलंबनाची शिक्षा आहे. या शिक्षेमुळे, फखर जमान मुलतान सुलतान्स आणि इस्लामाबाद युनायटेड विरुद्ध खेळू शकणार नाही.
