क्रिकेट खेळाडूंचे मोठ्या संख्येने चाहते असतात. कधी-कधी त्यांच्या प्रसिद्धीचा वापर लोक कल्याणाच्या कामासाठी केला जातो. त्यांना मानद पदव्या किंवा सरकारी पदे दिली जातात, ही गोष्ट आपल्यासाठी काही नवीन नाही. जगभरातील अनेक क्रिकेटपटूंना असा सन्मान मिळालेला आहे. भारतातही महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर यांना लष्कराच्या गणवेशाने सन्मानित करण्यात आले आहे. हरभजनसिंग पंजाब पोलीस दलात कार्यरत आहे. अशाच गणवेश मिळालेल्या खेळाडूंमध्ये आता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचा समावेश झाला आहे.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीची ४ जुलै रोजी पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खैबर पख्तुनख्वा (केपी) पोलीस विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्याला ‘गुडविल अॅम्बेसेडर’ बनवले आहे. पोलीस आणि जनतेमधील भावनिक दरी कमी करण्यासाठी आफ्रिदीची मदत घेण्यात आल्याचे म्हटले गेले आहे.

शाहीन आफ्रिदीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एका कार्यक्रमातील छायाचित्र शेअर केले आहे. त्या छायाचित्रामध्ये त्याने पोलीस दलाचा गणवेश घातलेला आहे. “खैबर पख्तुनख्वा (केपी) पोलीस विभागाचा सदिच्छा दूत म्हणून नियुक्त होणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. आपली मातृभूमी सुरक्षित ठेवल्याबद्दल मी सर्व पाकिस्तानी सैन्याचे आभार मानतो. आपले प्रेम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद. पाकिस्तान झिंदाबाद!”, असे ट्वीटही त्याने केले आहे. त्याचे हे ट्वीट आणि फोटो व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – India vs England 5th Test : क्रिकेटच्या मैदानात ‘बेझबॉल’ची चर्चा! हा प्रकार नेमका आहे तरी काय?

शाहीन आफ्रिदी लवकरच श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानकडून खेळताना दिसणार आहे. १६ जुलैपासून गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ही कसोटी मालिका सुरू होईल. तर, दुसरा कसोटी सामना २४ जुलै रोजी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. शाहीन आतापर्यंत पाकिस्तानसाठी २४ कसोटी सामने खेळला आहे. त्यात त्याने २५.०८ च्या सरासरीने एकूण ९४ बळी घेतलेले आहेत.