पाकिस्तानने पुढच्या महिन्यात भारतात होणाऱ्या टी२० वर्ल्डकपमधून माघार घ्यावी असं आवाहन पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतिफने केलं आहे. पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतली तर वर्ल्डकपची प्रतिष्ठाच लयाला जाईल असं लतीफ म्हणाले.

‘पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतली तर सगळं चित्र कोलमडून जाईल. वर्ल्डकप वर्ल्डकप राहणार नाही. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना होईल. पण वर्ल्डकपची प्रतिष्ठा धुळीस मिळेल. वर्ल्डकप हा विषयच संपून जाईल’, असं लतीफ म्हणाले.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी यांनी पाकिस्तान टी२० वर्ल्डकपमधून माघार घेण्याचा विचार करत आहे असं म्हटलं होतं. त्यासंदर्भात लतिफ यांना विचारण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.

‘आजच्या पत्रकार परिषदेतून असंच वाटतंय की पाकिस्तान माघार घेत आहे. नक्वी सरकारशी चर्चा करणार आहेत. माझ्या मते यासंदर्भात निर्णय आधीच झालेला असावा. घोषणा थोड्या दिवसात करण्यात येईल’, असं लतीफ म्हणाले.

‘बांगलादेशने भारतात न खेळण्याची भूमिका कायम ठेवली याकरता त्यांचं कौतुक. त्यांचा निर्धार पक्का दिसला. बांगलादेशने आपल्या विचारांप्रति सुस्पष्ट असल्याचं दाखवून दिलं. त्यांना देशहिताचा विचार केला. आता पाकिस्तानने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्यांनी बोलणं थांबवून कृती करावी’.

‘भारताच्या क्रिकेटवर राजकारण्यांचा प्रभाव आहे. भारतात भाजपाचं सरकार आहे. याच पक्षाच्या अंमलाखाली बीसीसीआयचं प्रशासन चालतं. पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतल्यास जागतिक पातळीवरही असंख्य चाहत्यांचा हिरमोड होऊ शकतो. भारत-पाकिस्तान लढत होणार नाही. ५० टक्के चाहत्यांना भारत-पाकिस्तान सामना व्हावा असं वाटतं. ते सगळं वातावरण विरुन जाईल. पाकिस्तानने बांगलादेशला पाठिंबा दिला तर भारतावरचं, आयसीसीवरचं दडपण वाढेल. त्यांना चर्चा करावी लागेल. बांगलादेश एकटंच असेल तर त्यांच्यावर माघार घेतल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई होईल. पाकिस्ताननेही वर्ल्डकपमधून माघार घेतली तर ही स्पर्धाच राहणार नाही. आयपीएल स्पर्धा वाटेल’, असं लतीफ म्हणाले.

‘भारत पाकिस्तान मुकाबला क्रिकेटपुरता मर्यादित नाही. तो अॅथलेटिक्स तसंच अन्य खेळातही लागू आहे. पाकिस्तानने माघार घेतली तर जगभर बभ्रा होईल. जागतिक पातळीवर थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या संपत्तीत भारताचा वाटा सिंहाचा आहे. जरा विचार करा, पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतली आहे. पाकिस्तानऐवजी युगांडाला संधी मिळाली आहे. अहमदाबादला भारत-पाकिस्तानऐवजी भारत युगांडा सामना होईल’, असं लतिफ हसतहसत म्हणाले.

दरम्यान बांगलादेशने भारतात खेळायला दिलेला नकार कायम राखल्याने आयसीसीने त्यांच्याऐवजी स्कॉटलंडचा टी२० वर्ल्डकपमध्ये समावेश केला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव बांगलादेशने पुढील महिन्यात होणाऱ्या टी२० वर्ल्डकपमध्ये खेळण्यास नकार दिला. आयसीसीने खेळाडूंच्या सुरक्षेला धोका नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र बांगलादेशने भारतात खेळण्यास तयार नसल्याचं सांगितलं. याऐवजी आमचे सामने श्रीलंकेत खेळवा असा प्रस्ताव बांगलादेशने दिला. आयत्या वेळी स्पर्धेच्या वेळापत्रकात असा बदल होऊ शकत नसल्याचं आयसीसीने स्पष्ट केलं. यानंतर बांगलादेशने दुसऱ्या गटातून खेळवा असा विनंतीवजा प्रस्तावही ठेवला. मात्र आयसीसीने तोही फेटाळला. बांगलादेशने भारतात खेळावं किंवा माघार घ्यावी यापैकी एक निर्णय घ्यावा असं आयसीसीतर्फे सांगण्यात आलं. आयसीसीने यासंदर्भात १४-२ ने मतदानही घेतलं.