Shahid Afridi With Indian Flag Viral Video : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रीदी नेहमीच त्याच्या वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत असतो. काश्मीर असो किंवा भारतीय क्रिकेटचा विषय, आफ्रिदी नेहमीच भारताविरुद्ध गरळ ओकताना दिसतो. भारताच्या विरोधात टिप्पणी करून आफ्रीदी पाकिस्तानी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतो. पण आता मात्र व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळं आफ्रिदीवर स्तुतीसुमने उधळली जात आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे की, एक भारतीय क्रिकेट फॅन कतारमध्ये भारताच्या तिरंग्यावर ऑटोग्राफ मागतो. त्यानंतर आफ्रिदी त्याच्या हातात तिरंगा घेऊन त्यावर सही करून पुन्हा त्या चाहत्याकडे देतो. त्यानंतर तो व्यक्ती आफ्रिदीचे आभार मानून बसमधून निघून जातो. हे सुंदर दृष्य कॅमेरात कैद झाले असून व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे. एका पाकिस्तानी युजरने व्हिडीओ शेअर करत म्हटलं, मोठ्या मनाचा शाहिद आफ्रिदी… एका भारतीय चाहत्याला तिरंग्यावर ऑटोग्राफ दिला. या व्हिडीओला अन्य नेटकऱ्यांनीही जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
इथे पाहा व्हिडीओ
शाहिद आफ्रिदी कतारमध्ये निवृत्त झालेल्या खेळाडूंच्या लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये सहभागी झाला आहे. तो एशिया लायंन्स संघाचं नेतृत्व करत आहे. या संघात शोएब अख्तर, मिसबाह उल हकसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश आहे. आफ्रिदीच्या संघाने अंतिम सामन्यासाठी क्वालीफाय केलं आहे. २० मार्चला वर्ल्ड जायंट्स यांच्याविरुद्ध एशिया लायन्सचा सामना रंगणार आहे. आफ्रिदीने भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरसोबत मैदानात वादविवाद केला होता. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातही त्याने टीप्पणी केली होती.