भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुरावलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान हॉकी महासंघाने आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याची विनंती आशियाई हॉकी महासंघाला केली आहे. यासंदर्भात पाकिस्तान हॉकी महासंघाने औपचारिक विनंतीपत्र दिलं आहे.
या स्पर्धेत भारत, पाकिस्तानसह दक्षिण कोरिया, मलेशिया, चीन हे संघ सहभागी होणार आहेत. मात्र पाकिस्तानने त्यांचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याची विनंती केली आहे. भारत आणि पाकिस्तान संबंधांची सद्यस्थिती तसंच सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन तटस्थ ठिकाणी सामने खेळवण्याची विनंती पाकिस्तान हॉकी महासंघाने केली आहे. ‘खेळाडूंना मुक्त, सुरक्षित आणि पोषक वातावरणात खेळता यावं यासाठी ही विनंती करत आहोत. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही सर्व सहभागी देशांशी खेळू. खेळात राजकारण आणले जाणार नाही. आशियाई हॉकी महासंघ आमच्या विनंतीचा सकारात्मक विचार करेल अशी आशा आहे’, असं पाकिस्तान हॉकी महासंघाचे अध्यक्ष मोहयुद्दीन अहमद वाणी यांनी सांगितलं.
२७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत पुरुषांची आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पंजाबमध्ये आयोजित केली जाणार आहे. मोहाली आणि जालंधर इथे सामने होणार आहेत. मोहालीतल्या बलबीर सिंग सीनिअर इंटरनॅशनल हॉकी स्टेडियम आणि जालंधरमधल्या सुरजीत सिंग हॉकी स्टेडियममध्ये सामने होणार आहे.
जालंधर इथे उद्घाटन सोहळा होणार आहे. स्पर्धेचा पहिला टप्पा जालंधर इथे तर उत्तरार्ध मोहाली इथे आयोजित करण्यात आला आहे. हॉकी विश्वातल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी हा आमच्यासाठी मोठा सन्मानाचा आणि अभिमानाचा क्षण आहे असं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितलं.
