Pakistan Makes U Turn From T20 World Cup Boycott: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेला येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी मोठा फेरबदल करण्यात आला आहे. बांगलादेशने या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर बांगलादेशऐवजी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला आहे. बांगलादेशने भारतात येऊन ही स्पर्धा खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे बांगलादेशचे सामने दुसऱ्या देशात खेळवले जावे, अशी मागणी करण्यात आली होती. पण आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली. बांगलादेशनंतर पाकिस्तान सुद्धा भारताविरूद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान पाकिस्तानने आपल्या निर्णयावरून यू टर्न घेतला असल्याची माहिती समोर येत आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या सुत्राने सांगितले की, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पाकिस्तान संघाला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी कोलंबोला पाठवण्याच्या तयारीत व्यस्त आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ भारताविरूद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची शक्यता खूप कमी आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना १५ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे.

सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डने आधीच खेळाडूंच्या प्रवासाचं नियोजन केलं आहे. पाकिस्तानचा संघ २ फेब्रुवारीला कोलंबोला जाण्यासाठी रवाना होणार आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. पण पाकिस्तानने भारतात येण्यास नकार दिला आहे. आयसीसीच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारे सामने हे न्यूट्रल वेन्यूवर खेळवले जातील. त्यामुळे पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.

पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांनी संघाच्या सहभागाबाबत निर्णय घेण्यासाठी आयसीसीकडे मुदत मागितली आहे. २ फेब्रुवारीला सोमवार असून मोहसिन नक्वी पाकिस्तानच्या स्पर्धेतील सहभागाबाबत निर्णय कळवू शकतात. पण निर्णय येण्याआधीच खेळाडूंची टी-२० वर्ल्डकपसाठी श्रीलंकेला रवाना होण्याची तयारी सुरू झाली आहे. यावरून पाकिस्तानचा संघ स्पर्धेत सहभागी होणार, हे जवळजवळ निश्चित झालं आहे.

आगामी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत पाकिस्तानचा पहिला सामना ७ फेब्रुवारीला नेदरलँडविरूद्ध होणार आहे. त्यानंतर १० फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यात यूएसएचा सामना करणार आहे. त्यानंतर १५ फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. तर १८ फेब्रुवारीला पाकिस्तानचा सामना नामिबीयाविरूद्ध होणार आहे.