ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वीच रण पेटले आहे. एकीकडे हिमाचल प्रदेशचे राज्य सरकार सुरक्षा देण्यास अमर्थ असल्याचे सांगत असताना पाकिस्तानने सुरक्षेच्या कारणास्तव स्पर्धेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. जर आमच्या संघाला सुरक्षेची हमी मिळत नसेल आणि भारत सरकारकडून जर संघाच्या सहभागाबाबत जाहीर भूमिका घेतली जात नसेल तर आम्ही या स्पर्धेत का खेळावे, असा सवाल पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) उपस्थित केला आहे.
‘‘आम्ही आयसीसीला फक्त एकच गोष्ट सांगितली आहे आणि ती म्हणजे भारत सरकारने आम्हाला सुरक्षेची हमी देत असल्याचे जाहीर करावे. पण भारत सरकारकडून हीच गोष्ट होताना दिसत नाही. आम्ही यापूर्वीच संघाला विश्वचषकात खेळण्याची परवानगी दिली आहे. पण भारताने अद्याप पाकिस्तानच्या सुरक्षेविषयी शास्वती दिलेली नाही,’’ असे पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, ‘‘आम्ही बीसीसीआयच्या काही व्यक्तींशी यावर चर्चा केली असली तरी ते खासगीमध्ये सुरक्षेची हमी देत आहेत. हे सारे अंतर्गत राजकारणामुळे होत असून पाकिस्तानने भारतामध्ये यावे, असे त्यांचे म्हणणे आहे. पण याबाबत अधिकृत घोषणा कोणीही करताना दिसत नाही. भारत सरकारने आम्हाला लेखी हमी द्यावी, असे आम्ही आयसीसीला सांगितले आहे. पण जर त्यांनी हमी दिली नाही तर पाकिस्तानचा संघ विश्वचषकात खेळू शकत नाही.’’