भारतात होणाऱ्या टी२० वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. पाकिस्तानात जन्मलेल्या परंतु अमेरिकेकडून खेळणाऱ्या अली खानला भारताने व्हिसा नाकारल्याचं वृत्त आहे. अली खानने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ही गोष्ट शेअर केली आहे. अमेरिकेचा पहिला सामना ७ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध मुंबईत होणार आहे. याच लढतीने टी२० वर्ल्डकपची सुरुवात होणार आहे. दरम्यान केंद्र सरकार, बीसीसीआय तसंच अमेरिकेच्या क्रिकेट बोर्डाने अधिकृत माहिती दिलेली नाही.
अमेरिकेचा संघ तयारीच्या दृष्टीने आयोजित शिबिरासाठी श्रीलंकेत आहे. अली या संघाचा भाग आहे. अमेरिकेने टी२० वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा केलेली नाही. मात्र श्रीलंकेतील शिबिरात सहभागी झालेल्या १८ खेळाडूंमधूनच खेळाडूंची घोषणा होणं अपेक्षित आहे. क्रिकइन्फो वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
युएसए क्रिकेटवर बंदी आल्यानंतर आयसीसीने प्रशासन आणि लॉजिस्टिक्स यांची जबाबदारी स्वीकारली आहे. अली जगभरात टी२० लीगमध्ये नियमितपणे खेळतो. आयपीएल स्पर्धेतल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून तो खेळला आहे. कोलकाता संघाची मालकी असलेल्या अबू धाबी नाईट रायडर्स, त्रिनबागो नाईट रायडर्स तसंच लॉस एंजेलिस नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधित्व करतो. १८व्या वर्षापर्यंत पाकिस्तानात लहानाचा मोठा झालेला अली अमेरिकेतल्या ओहिओ प्रदेशात राहतो.
३५वर्षीय अली हा अमेरिकेच्या संघातील पाकिस्तानी वंशाच्या तीन खेळाडूंपैकी एक आहे. एहसान अदील आणि मोहम्मद मोहसीन हे दोन अन्य पाकिस्तानी वंशाचे खेळाडू आहेत. याप्रश्नी तोडगा काढण्यादृष्टीने आयसीसी प्रयत्नशील आहे.
अमेरिकेप्रमाणे टी२० वर्ल्डकपमध्ये सहभागी होणाऱ्या ओमान, युएई आणि इटली संघात पाकिस्तानी वंशाचे खेळाडू आहेत. त्यांना स्पर्धेत खेळण्यासाठी व्हिसा मिळतो का पाहणं उत्सुकतेचं आहे.
भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्यासाठी व्हिसा मिळवणं ही संबंधित बोर्डाची जबाबदारी असेल. आवश्यकता असल्यास आयसीसीतर्फे कागदपत्रांसाठी मदत पुरवली जाईल. युएसए क्रिकेटवर बंदी असल्याने या संघाची जबाबदारी आयसीसीकडेच आहे.
याआधीही पाकिस्तानी वंशाच्या अन्य संघातील खेळाडूंना भारताचा व्हिसा मिळवण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. इंग्लंड संघातील रेहान अहमद आणि शोएब बशीर यांना व्हिसा मिळवण्यासाठी बराच पाठपुरावा करावा लागला होता. अमेरिकेच्या संघाला २०२४ वर्ल्डकप स्पर्धेत सुपर एट प्रवेशासह २०२६ टी२० वर्ल्डकपसाठी थेट प्रवेश मिळाला.
अमेरिकेच्या संघाचा सलामीचा सामना ७ फेब्रुवारीला भारताशी होत आहे. पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध १० फेब्रुवारीला कोलंबोत होणार आहे. नेदरलँड्सविरुद्ध १३ तर नामिबियाविरुद्ध १५ तारखेला मुकाबला होणार आहे.
