पाकिस्तान क्रिकेटमध्ये अंतर्गत बंडाळ्या नवीन नाहीत. पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. सलग दोन कसोटीत पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घाऊक बदल केले. सात खेळाडूंना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन प्रशिक्षकांनाही डच्चू देण्यात आला. सात खेळाडूंच्या नव्या खेळाडूंची निवड करण्यात आली. यामध्ये वेगवान गोलंदाज रझाउल्लाचा समावेश होता. पेशावरजवळच्या मारदान गावच्या रझाउल्लाची राष्ट्रीय संघात निवड झाली. निवडीचा कॉल आला त्यावेळी रझाउल्लाकडे पासपोर्टही नव्हता. निवडसमिती सदस्यांनी रझाउल्लाला कॉल केला तेव्हा त्याचा फोन स्विचऑफ होता. सुदैवाने त्याच्या घरच्यांशी संपर्क झाला. रझाउल्लाकडे पासपोर्ट नसल्याने कागदपत्रांसाठी धावपळ झाली. वरिष्ठ पातळीवर सूत्रं हलली आणि काही तासात पासपोर्ट तयार झाला. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीदरम्यान बराच कालावधी असल्याने रझाउल्ला वेळेत इंग्लंडमध्ये पोहोचू शकला.
वेगात आणि अचूकतेसह गोलंदाजी करण्यासाठी रझाउल्लाचं नाव लोकप्रिय होत आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये अवघ्या वर्षभरापूर्वी त्याने खेळायला सुरुवात केली. मात्र त्याच्या वेगाने अल्पावधीत सगळ्यांना आकृष्ट केलं. इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तान संघाची कामगिरी चांगली झाली असती तर रझाउल्लाला संधी मिळण्याची कोणतीच शक्यता नव्हती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दोन सलग पराभवानंतर निम्म्याहून अधिक संघाला माघारी पाठवलं. यामुळे रझाउल्लाचा खेळण्याचा मार्ग सुकर झाला.
पाकिस्तानचा पहिला डाव १३३ धावांतच आटोपला. त्यामुळे गोलंदाजांवरचं दडपण वाढलं. रझाउल्लाने जो रुटसारख्या अनुभवी फलंदाजाला बाद करत पहिली विकेट पटकावली. टप्पा पडून आत आलेल्या रझाउल्लाच्या चेंडूवर रूट पूर्णत: निष्प्रभ ठरला. अंपायर ख्रिस गफनी यांनी रझाउल्लाच्या अपीलला होकार देत रुटला बाद दिलं. रुटने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. मात्र अंपायरचा निर्णय बदलला नाही आणि रझाउल्लाच्या पारडयात पदार्पणातच मोठी विकेट मिळाली. रझाउल्लाच्या गोलंदाजीवर धावाही वसूल झाल्या मात्र त्यानेच सलामीवर इमिलो गे याला बाद करत भागीदारी फोडली. इमिलोने ९ चौकारांसह ६० धावांची खेळी केली.
डॉन वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे हाय परफॉर्मन्स डिरेक्टर आकिब जावेद हे रझाउल्लाच्या गोलंदाजीने प्रभावित झाले होते. नॅशनल क्रिकेट अकादमीत रझाउल्लाला खेळताना त्यांनी पाहिलं होतं.
‘माझा मोठा भाऊ क्रिकेट खेळायचा. त्याला बघूनच मी खेळायला सुरुवात केली. मी रस्त्यावरच प्रामुख्याने खेळायचो. दोन-तीन वर्ष खेळत राहिलो. U19 पातळीवर खेळलो. ट्रायल्सही दिल्या. पण माझी निवड झाली नाही. त्यानंतर मी जिल्हास्तरीय पातळीवर खेळलो. २०२४-२५ हंगामात मी ग्रेड २ क्रिकेट खेळलो. त्यानंतर फर्स्टक्लास क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तिथे ८ सामन्यात ३० विकेट्स पटकावल्या’, असं रझाउल्लाने सांगितलं.
