Pakistan PM Statement on Boycott vs India Match in T20 WC 2026: टी-२० विश्वचषक २०२६ अवघ्या काही तासांवर आलेला असताना पाकिस्तान भारताविरूद्ध टी-२० विश्वचषक सामना न खेळण्यावर ठाम आहे. टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १५ फेब्रुवारी रविवारी असणार आहे, पण हा सामना होणार की नाही, यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी यावर वक्तव्य केलं आहे.

पाकिस्तान सरकारने १ फेब्रुवारीला ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये म्हटलं आहे की संघ टी-२० विश्वचषकात सहभागी होईल; परंतु १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्धच्या गट सामन्यात मैदानात उतरणार नाही. पोस्टमध्ये या निर्णयाचे कोणतेही कारण दिलेलं नव्हतं. पण आता पंतप्रधानांनी मात्र या निर्णयावर वक्तव्य करत पाकिस्तानने हा निर्णय का घेतला, त्यामागचं कारण सांगितलं आहे.

शाहबाज शरीफ यांनी सांगितलं भारताविरूद्ध T20 WC सामन्यावर बहिष्कार टाकण्यामागचं खरं कारण

शाहबाज शरीफ यांनी ५ फेब्रुवारीला मंत्रिमंडळाला सांगितलं की, “टी-२० विश्वचषकाबाबत आम्ही एक स्पष्ट पाऊल उचललं आहे की आम्ही भारताविरुद्ध सामना खेळणार नाही कारण क्रीडा क्षेत्रात कोणतेही राजकारण नसावे. आम्ही काळजीपूर्वक विचार करून ही भूमिका घेतली आहे आणि आपल्याला बांगलादेशच्या पाठीशी पूर्णपणे उभं राहिलं पाहिजे. मला वाटतं की हा एक अतिशय योग्य निर्णय आहे.”

२०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडलेल्या बांगलादेश संघासोबत एकता दर्शविण्यासाठी भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. पाकिस्तानने १ फेब्रुवारीला पोस्ट करत भारताविरूद्ध सामन्यावर बहिष्कार टाकत असल्याचं जाहीर केल्यानंतर पाकिस्तानने निवेदन जाहीर केलं. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की पाकिस्तानने अद्याप आयसीसीला याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. एका संघाविरुद्धच्या सामन्यावर बहिष्काराच्या सोयीस्कर वागण्यामुळे खेळभावनेला ठेच पोहोचते आणि स्पर्धेचं निकोप वातावरणही बिघडतं असं आयसीसीने म्हटलं आहे. पाकिस्तानने अशा प्रकारे एका लढतीवर बहिष्कार टाकला तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात असा इशाराही आयसीसीने दिला आहे.

आयसीसीच्या बैठकीत बांगलादेश मुद्द्यावर १४-२ अशी मतं

आयसीसी बोर्डाने टी-२० विश्वचषकाचं वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर बांगलादेशचे श्रीलंकेत सामने पुन्हा आयोजित करण्याच्या मुद्द्यावर मतदान घेतलं, ज्यामध्ये बांगलादेशविरूद्ध १४-२ असं मतदान झालं. फक्त पाकिस्तानने बांगलादेशच्या बाजूने मतदान केलं. बांगलादेशने यानंतरही आपला निर्णय न बदलल्याने स्पर्धेबाहेर होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बांगलादेशच्या जागी स्कॉटलंड स्पर्धेत सामील झाला.