Pakistan Withdraws Asian Hockey Championship 2026 Neutral Venue Demand Rejected: पाकिस्तानने आगामी आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६मधून अधिकृतपणे माघार घेतली आहे. विशेष म्हणजे, ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात येणार होती. पाकिस्तानने आपले सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जाण्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी मान्य न झाल्याने अखेर पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तानने भारतासंबंधित अट मान्य न केल्याने सलग दुसऱ्या मोठ्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. यापूर्वी पाकिस्तानने वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स स्पर्धेतून माघार घेतली. भारताने गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेत पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून पाकिस्तानविरूद्ध खेळण्यास नकार दिला होता. यामुळे या झालेल्या प्रकाराबाबत भारताने माफी मागावी अशी त्यांची अट होती. ही अट मान्य न झाल्याने पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तान हॉकी फेडरेशनने (PHF) या स्पर्धेतील आपले सामने तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याची मागणी केली होती. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाचं कारण देत फेडरेशनने ही भूमिका मांडली होती. मात्र, त्यांची मागणी फेटाळण्यात आली. पाकिस्तानने माघार घेतल्यानंतर बांगलादेशला स्पर्धेत त्यांच्या जागी संधी देण्यात आली आहे.

ही स्पर्धा २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान होणार असून, जालंधर आणि मोहाली या शहरांची यजमानपदासाठी निवड करण्यात आली आहे. पाकिस्तान हॉकी फेडरेशनने आशियाई हॉकी फेडरेशनकडे (AHF) तटस्थ ठिकाणी सामने आयोजित करण्याची मागणी केली होती. मात्र, सुरक्षेबाबतच्या चिंता असूनही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार आणि ठरलेल्या ठिकाणीच होईल, असं आशियाई हॉकी फेडरेशनने स्पष्ट केलं.

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचा विक्रमम

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून तब्बल दोन दशकांनंतर आंतरराष्ट्रीय हॉकीचं पंजाबमध्ये पुनरागमन होणार आहे. या स्पर्धेत जपान, चीन, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि बांगलादेश हे संघ सहभागी होणार आहेत. पाकिस्तानचा संघ यापूर्वी २०२३मध्ये भारतात झालेल्या या स्पर्धेत खेळला होता. त्या स्पर्धेत सहा संघांमध्ये पाकिस्तानला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं.

भारतीय हॉकी संघ २०२६च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून भारतीय संघ या स्पर्धेत उतरणार आहे. भारताने आतापर्यंत चार वेळा आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं असून, यंदा पाचव्यांदा जेतेपद जिंकण्याचा संघाचा प्रयत्न असेल.