पीटीआय, कराची
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे संपूर्ण यजमानपद स्वीकारण्याची श्रीलंकेने तयारी दर्शविल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) श्रीलंकेत एकदिवसीय मालिका खेळण्यास नकार दिला आहे.‘पीसीबी’च्या आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदाच्या संमिश्र प्रारूप आराखडय़ास विरोध करून श्रीलंका क्रिकेट मंडळाने स्वतंत्रपणे स्पर्धेचे आयोजन करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि श्रीलंका क्रिकेट मंडळ यांच्यातील संबंधांत तेढ निर्माण झाली आहे. पाकिस्तानने पुढील महिन्यात श्रीलंकेत एकदिवसीय मालिका खेळण्यास नकार देणे हे याचे उत्तम उदाहरण आहे, असे ‘पीसीबी’च्या सूत्राने सांगितले.




पाकिस्तानचा संघ जुलै महिन्यात श्रीलंकेत जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) पुढील सत्रातील दोन कसोटी सामने आणि त्यानंतर एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणे अपेक्षित होते. श्रीलंकेचा संघ एकदिवसीय विश्वचषकाच्या पात्रता फेरीत खेळणार असल्यामुळे त्यापूर्वी सराव म्हणून या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आता हा दौरा होणार नाही. पाकिस्तानने श्रीलंकेत खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदाचा अधिकार या वेळी पाकिस्तानकडे असताना, श्रीलंकेने आयोजनाची तयारी दाखवल्याने ‘पीसीबी’ नाराज आहे.
बांगलादेश व अफगाणिस्तान देशांनीही ‘पीसीबी’च्या प्रस्तावास विरोध केला आहे. या तीनही देशांशी आमचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने त्यांनी स्पर्धा पाकिस्तानात व्हावी यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) राजी करणे ‘पीसीबी’ला अपेक्षित होते. मात्र, त्यापैकी काहीच घडले नाही. श्रीलंका दौरा रद्द करून ‘पीसीबी’ने आपला नाराजीचा सूर दाखवून दिला आहे. आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत ‘बीसीसीआय’ने आपली भूमिका कायम ठेवल्यास, आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसंदर्भात मोठा निर्णय घेण्याची तयारी ‘पीसीबी’ने ठेवली असल्याचेही या सूत्राने सांगितले.