Pakistan Semi Final Scenario In ICC T20 World Cup: आयसीसी टी -२० वर्ल्डकप सुपर ८ फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. लवकरच सेमी फायनलमध्ये जाणाऱ्या संघांचं चित्र स्पष्ट होणार आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तान आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवून सेमी फायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकअखेर १६४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडकडून कर्णधार हॅरी ब्रुकने दमदार शतकी खेळी केली आणि इंग्लंडला शेवटच्या षटकात दमदार विजय मिळवून दिला. इंग्लंडने तर सेमी फायनलमध्ये प्रवेश केला, पण पाकिस्तानचं काय? कसं असेल समीकरण? जाणून घ्या.

पाकिस्तानचा संघ अजूनही सेमी फायनलमध्ये जाऊ शकतो का?

पाकिस्तानला अजूनही सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. पण हा प्रवास सोपा मुळीच नसेल. पाकिस्तानला आता सेमी फायनल गाठण्यासाठी इतर संघांवर अवलंबून राहावं लागणार आहे. इतर संघांच्या निकालावरून पाकिस्तानचा संघ सेमी फायनलमध्ये जाणार की नाही, हे ठरणार आहे. सुपर ८ फेरीत पाकिस्तानचे २ सामने पूर्ण झाले आहेत. यापैकी एक सामना पावसामुळे धुतला गेला. तर एका सामन्यात इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला होता.

पाकिस्तानसाठी कसं असेल समीकरण?

पाकिस्तानसाठी सर्वात सोपं समीकरण म्हणजे, श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. त्यानंतर श्रीलंका आणि इंग्लंडने न्यूझीलंडला हरवणं गरजेचं असणार आहे. असं झाल्यास न्यूझीलंडला एका गुणावर समाधान मानावं लागेल. तर श्रीलंकेचा संघ २ गुणांवर पोहोचू शकतो. पाकिस्तानने श्रीलंकेला हरवलं तर पाकिस्तानचा संघ ३ गुणांपर्यंत पोहोचेल. अशाप्रकारे न्यूझीलंड आणि श्रीलंकेचा संघ सेमी फायनलच्या शर्यतीतून बाहेर होऊ शकतो आणि पाकिस्तानचा संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करू शकतो.

आणखी एक समीकरण असं आहे की, पाकिस्तानचा एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. जर श्रीलंके विरुद्ध होणारा सामना देखील पावसामुळे रद्द झाला, तर पाकिस्तानला २ गुणांवर समाधान मानावं लागेल. तसेच श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना देखील पावसामुळे रद्द झाला, तर श्रीलंकेलाही २ गुणांवर समाधान मानावं लागेल. त्यानंतर न्यूझीलंडचा इंग्लंडकडून पराभव झाला, तर न्यूझीलंडलाही २ गुणांवर समाधान मानावं लागेल. अशा स्थितीत पाकिस्तान, श्रीलंका आणि न्यूझीलंड हे तिन्ही संघ २-२ गुणांवर असतील. त्यामुळे ज्या संघाचा नेट रनरेट चांगला असेल तो संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल.