हेडिंग्ले आणि लॉर्ड्स कसोटीत मानहानीकारक पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघात तसंच सपोर्ट स्टाफमध्ये घाऊक बदल केले आहेत. पाकिस्तान बोर्डाने इंग्लंड दौऱ्यातील सात खेळाडूंना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरीने मुख्य प्रशिक्षक सर्फराझ अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांनाही रिलीज करण्यात आलं आहे.
माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान, सलामीवीर इमाम उल हक, हेडिंग्ले कसोटीत कर्णधारपद भूषवलेला सलमान अली अघा, अली उस्मान, आमीर जमाल, अवैस झफर आणि खुर्रम शहझाद यांना मायदेशी पाठवण्यात आलं आहे. या घाऊक बदलांमुळे तिसऱ्या कसोटीत पाकिस्तान संघाचा चेहरामोहराच बदलून जाणार आहे. तिसरी कसोटी ९ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्यामुळे नव्या खेळाडूंना इंग्लंडमध्ये येऊन स्थिरावण्यास वेळ मिळणार आहे.
देशाचं प्रतिनिधित्व न केलेले पाच खेळाडू इंग्लंडसाठी रवाना झाले आहेत. यामध्ये अराफत मिन्हास, मोहम्मद इम्रान ज्युनियर, सईद बेग, मोहम्मद इम्रान रंधावा आणि रझाउल्ला यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त सईम अयुब आणि अब्दुल्ला फझल यांचा संघात समावेश करण्यात आला. वनडे आणि टी२० संघाचे प्रशिक्षक माईक हेसन आणि अॅशले नॉफक यांना कसोटी संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
इंग्लंडने हेडिंग्ले कसोटी एक डाव आणि १०३ धावांनी जिंकली तर लॉर्ड्स कसोटीत १९४ धावांनी विजय मिळवला होता. हेडिंग्ले कसोटीत बाबर आझम दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्याऐवजी सलमान अली अघाने नेतृत्व केलं होतं. त्यालाही घरी पाठवण्यात आलं आहे. यष्टीरक्षण आणि कर्णधारपद असं दोन्ही भूषवलेला रिझवानही घरी परतणार आहे. इमाम उल हकची दुखापत खोटी असल्याचा आरोप माजी खेळाडूंना केला. तोही मायदेशी परततो आहे. अब्दुला शफीक, सौद शकील आणि मोहम्मद अब्बास यांनी या दौऱ्यात चांगली कामगिरी केली आहे. अब्बासने क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स मैदानावर डावात पाच विकेट्स घेण्याची किमया केली.
