काही दिवसांवर आलेल्या टी२० स्पर्धेत खेळणार की नाही याविषयी दोलायमान पाकिस्तानने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला चीतपट करत स्पर्धेसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. बांगलादेशला पाठिंबा म्हणून पाकिस्तानही टी२० स्पर्धेतून माघार घेणार असं चित्र होतं. मात्र माघार घेणं किंवा बहिष्कार यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा आर्थिक फटका बसला असता. याव्यतिरिक्त भविष्यात आयसीसी स्पर्धांचं आयोजनातून बाद होणं, पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेसाठी विदेशी खेळाडूंनी ना हरकत प्रमाणपत्र न मिळणं असे अनेक मुद्दे होते. यामुळे पाकिस्तानने वर्ल्डकपसाठी श्रीलंकेला जायची तयारी केली.

लाहोरच्या गडाफी स्टेडियमवर झालेल्या लढतीत पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. साहिबजादा फरहान ५ धावा करून तंबूत परतला. मात्र यानंतर सईम अयुब आणि कर्णधार सलमान अघा यांनी डाव सावरला. २३ धावा करून सईम माघारी परतला. ट्रोलर्सच्या लक्ष्यस्थानी असलेला पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम ५ धावांत २ धावाच करू शकला. कर्णधार सलमानने ४० चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ७६ धावांची वादळी खेळी केली. उस्मान खानने ३६ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली. मोहम्मद नवाझने २० चेंडूत २८ धावा केल्या. पाकिस्तानने १९८ धावांची मजल मारली. ऑस्ट्रेलियातर्फे झेव्हियर बार्टलेट, मॅथ्यू कुन्हेमन, कूपर कोनोली, शॉन अबॉट आणि अॅडम झंपा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानच्या फिरकीपटूंसमोर शरणागती पत्करली. अबरार अहमद (१४ धावांत ३), शदाब खान (२६ धावांत ३) आणि उस्मान तरीक (१६ धावांत २) यांच्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. कॅमेरुन ग्रीनने ३५ तर मॅथ्यू शॉर्टने २७ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही ना मोठी भागीदारी रचता आली. ऑस्ट्रेलियाने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. त्यांचा डाव १५.४ षटकात १०८ धावांतच आटोपला.

या विजयासह पाकिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. सलमान अघाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.