Ahmed Shehzad Viral Video: पाकिस्तानचा स्टार फलंदाज अहमद शहजाद सध्या तुफान चर्चेत आहे. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेसाठी झालेल्या ड्राफ्टमध्ये त्याला कुठल्याही संघाने आपल्या संघात स्थान दिलेलं नाही. त्यामुळे त्याला लाईव्ह कार्यक्रमात अश्रू अनावर झाले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करूनही त्याला दुर्लक्ष केलं गेलं आहे. याचं त्याला दुःख झालं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अहमद शहजादने सोशल मिडिया आणि टीव्हीवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्याविरुद्ध जाणूनबुजून कट रचला जात असल्याचे त्याने सुचवले. या स्पर्धेतील संघांनी त्याच्यापेक्षा कमी आकडेवारी असलेल्या खेळाडूंची निवड केली आहे. यासह शहजादने मोठा आरोपही केला आहे. काही मोठे लोक त्याला या लीगपासून दूर ठेवण्यासाठी मोठे लोकं काम करत आहेत. ज्यांची नावं भविष्यात उघड करणार असल्याचंही त्याने सांगितलं.
पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद आमिरसोबत एका कार्यक्रमात बोलताना अहमद शहजाद म्हणाला, “हो, मी भावनिक होतो. खरं सांगू तर मला खूप वाईट वाटलं. मला खेळायचं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने माझे सर्व सहकारी खेळत आहेत असं म्हटलंय, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल आनंद होतो. मी असा व्यक्ती आहे, जेव्हा एखाद्यासोबत काही चांगलं घडतं तेव्हा मला खूप आनंद होतो.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “दोन – तीन दिवस वेदना होतात. भावनांमध्ये चढ उतार होतो. रात्री जेव्हा मी झोपण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी एकाच गोष्टीचं वाईट वाटतं. माझा मुलगा ९ वर्षांचा आहे. त्यालाही वाटतं की, मी खेळावं. तो माझ्या शेजारी झोपतो आणि आता मोठा झाला आहे. तो मला म्हणतो, ‘बाबा, मला आठवतंय तुम्ही खेळत होता, पण मी तुम्हाला नीट लक्षात ठेवू शकेन का?’
अहमद शहजादने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने नॅशनल टी-२० कप स्पर्धेत अर्धशतकं झळकावली. तरीदेखील पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील ६ पैकी एकाही संघाने त्याला आपल्या संघात स्थान देण्यात रस दाखवला नाही. या अपमानामुळे त्याने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
