Pakistan Super-8 Qualification T20 WC 2026: पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या टी-२० विश्वचषक २०२६ प्राथमिक फेरीतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तानची अगदी छोटीशी चूक आणि संघ सरळ स्पर्धेबाहेर होऊ शकतो. अजूनही सुपर-८ फेरी गाठण्याची आशा असली तरी, संघासमोर संकट मात्र नक्कीच आहे. पाकिस्तानचा संघ नामिबियाविरूद्ध अखेरचा सामना खेळणार आहे. त्यासह संघाला सुपर-८ फेरी गाठण्यासाठी कसं समीकरण असेल, हे जाणून घेऊया.
सलमान अली आघाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ श्रीलंकेत आपले सर्व टी-२० विश्वचषक सामने खेळत आहे. संघाने त्यांच्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांनी अमेरिकेचा पराभव केला. पहिले दोन सामने जिंकून संघाने आधीच दोन गुण मिळवले होते. पण टीम इंडियाने पाकिस्तानचा इतका वाईट पराभव केला की संघाला त्याचा मोठा फटका बसला आहे. भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला, ज्यामुळे पाकिस्तानचा नेट रन रेट लक्षणीयरीत्या खराब झाला. पाकिस्तानचे आता चार गुण झाले आहेत.
पाकिस्तानबरोबर अमेरिकेचे देखील चार गुण झाले आहेत. भारत आणि पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर अमेरिकेने नेदरलँड्स व नामिबिया या संघांना पराभूत करत ४ गुण मिळवले. यासह अ गटात भारतीय संघ पहिल्या स्थानी तर अमेरिकाचा संघ ४ गुण व +०.७८८ च्या चांगल्या नेट रन रेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा संघ ४ गुणांसह -०.४०३ नेट रन रेटसह तिसऱ्या स्थानी आहे.
टी-२० विश्वचषकातील पाकिस्तान क्रिकेट संघाचा पुढील सामना बुधवार, १८ फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध होणार आहे. हा सामना पाकिस्तानसाठी नॉकआउट सामना बनला आहे. जर पाकिस्तानने हा सामना गमावला तर त्यांच्याकडे फक्त चार गुण राहतील, जे अमेरिकेइतकेच आहेत. तर अमेरिकेचा नेट रन रेट पाकिस्तानपेक्षा चांगला असल्याने अमेरिका सुपर-८ साठी क्वालिफाय होऊ शकते.
कोलंबोमध्ये पावसाने हजेरी लावली तर पाकिस्तानचं काय होणार?
जर पाकिस्तान संघ जिंकण्यात यशस्वी झाला तर त्याचे गुण चार वरून सहा होतील, म्हणजेच पाकिस्तान कोणत्याही अडथळ्याशिवाय सुपर-८ मध्ये जाईल. जर कोलंबोमध्ये सामन्यादरम्यान पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तर काय होईल? आयसीसीच्या नियमांनुसार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जातो. यासह पाकिस्तानचे पाच गुण होतील आणि संघ सुपर-८ मध्ये पोहोचेल. एकूणच, पाकिस्तानला त्यांचा पुढचा सामना जिंकावाच लागेल. पण जर संघ पराभूत झाला तर त्यांनी घरी परतावं लागेल.

