Pakistan Super 8 Scenario: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेला दमदार सुरूवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना कोलंबोत पार पडला. या सामन्यात पाकिस्तान आणि नेदरलँड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नेदरलँडच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंना चांगलाच घाम फोडला. हा सामना पाकिस्तानच्या हातून जवळजवळ निसटला होता. शेवटच्या षटकात सामना फिरला आणि पाकिस्तानने हा सामना जिंकला. पाकिस्तानने हा सामना ३ चेंडू शिल्लक ठेवून आणि ३ गडी राखून आपल्या नावावर केला. विजयाचं खातं उघडूनही पाकिस्तानचं सुपर ८ फेरीत पोहोचणं कठीण आहे. कसं असेल समीकरण? जाणून घ्या.

या स्पर्धेत एकूण २० संघांनी सहभाग घेतला आहे. या संघांना ४ गटात विभागण्यात आलं आहे. पाकिस्तानचा अ गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात भारतीय संघ देखील आहे. पाकिस्तानने नेदरलँडला हरवून गुणतालिकेत २ गुणांची भर घातली आहे. पण १६ फेब्रुवारीला भारताविरूद्ध होणारा सामना खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तान २ गुण असेच गमावणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला उर्वरीत २ सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवणं गरजेचं असणार आहे. या २ पैकी एकही सामना गमावला किंवा कमी फरकाने जिंकला तर पाकिस्तानचं सुपर ८ फेरी गाठणं कठीण होऊ शकतं.

पाकिस्तानने भारताविरूद्धचा सामना न खेळण्याचा निर्णय घेऊन आपल्याच पायावर कुऱ्हाड मारण्याचा निर्णय घेतला आहे.याहून अधिक टेंशन वाढवणारी बातमी म्हणजे, पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. श्रीलंकेत कधीही पाऊस पडू शकतो. त्यामुळे पावसामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना १-१ गुण दिला जाईल. तसेच डकवर्थ लुईसमुळे सामन्याचा निकाल लावला जाऊ शकतो. जर पावसामुळे एकही सामना रद्द झाला, तर पाकिस्तानचं सुपर ८ फेरीत प्रवेश करणं कठीण होईल.

पाकिस्तानने नेदरलँडविरूद्ध झालेल्या सामन्यात ३ गडी राखून विजय मिळवला आहे. हा सामना जिंकून पाकिस्तानने २ गुणांची कमाई केली आहे. पाकिस्तानचा नेट रनरेट ०.२४० इतका आहे. पाकिस्तानचा पुढील सामना १५ फेब्रुवारीला होणार आहे. पाकिस्तानने हा सामना खेळण्यास नकार दिला आहे. हा सामना झाल्यानंतर पाकिस्तानचा पुढील सामना १८ फेब्रुवारीला नामिबीयाविरूद्ध होणार आहे.