२६ मार्चपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगच्या ११व्या हंगामावर मोठं संकट ओढवलं आहे. पाकिस्तानमधील सशस्त्र विरोधी गटाकडून थेट आणि धक्कादायक इशारा मिळाल्यानंतर स्पर्धा होणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP)च्या जमात-उल-अहरार या गटाने अधिकृत निवेदनाद्वारे परदेशी खेळाडूंना तात्काळ स्पर्धेतून माघार घेण्याचा इशारा दिला आहे. अस्थिर आणि धोकादायक सुरक्षा परिस्थितीचा हवाला देत हा इशारा देण्यात आला आहे.

गटाचा प्रवक्ता असद मन्सूर यांनी आपल्या वक्तव्यात, या हाय-प्रोफाईल टी-२० लीगला खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानसारख्या भागातील दुःखाची एक क्रूर थट्टा असं संबोधण्यात आलं आहे. PSL स्पर्धा घेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड देशात स्थिरतेचं वातावरण असल्याचं दाखवत आहे. पण मूळ परिस्थिती मात्र वेगळी आहे. पाकिस्तान सुपर लीगचं देशातील उत्सावाचं वातावरण जखमेवर मीठ चोळण्यासारखं असल्याचं म्हटलं. तेथील लोकांवर होत असलेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा आयोजित करणं अमानुष असल्याचा आरोप केला आहे.

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP)ने PSLमधील सर्व सहभागी, विशेषतः परदेशी खेळाडूंना उद्देशून स्पष्ट आणि तातडीचा इशारा दिला आहे. “सध्याची देशातील अंतर्गत सुरक्षा आणि राजकीय परिस्थिती अत्यंत अस्थिर आणि धोकादायक आहे. ज्या वातावरणात अनेक भागांत लष्करी कारवाया आणि नागरी अस्थिरता वाढली आहे, त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सुरक्षिततेची हमी देता येणार नाही. अशा गंभीर परिस्थितीत तुम्ही तुमच्या वैयक्तिक सुरक्षेला प्राधान्य द्यावे आणि तात्काळ स्पर्धेतून माघार घ्यावी,” असा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ पाकिस्तानात दाखल झाला. तो मुलतान सुल्तान्स संघात सहभागी झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या बिग बॅश लीगमध्ये यशस्वी कामगिरी केलेल्या स्मिथचा PSLमधील हा पहिलाच हंगाम असेल. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB)कडून राष्ट्रपती-स्तरावरील कडक सुरक्षा व्यवस्था असल्याचा दावा केला जात असला, तरी या धमकीचा खेळाडूंवर मानसिक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुढे निवेदनात म्हटलं आहे, “आज पाकिस्तानातील, विशेषतः खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमधील लोक अभूतपूर्व अडचणींचा सामना करत आहेत. लष्करी कारवाया आणि राज्यस्तरीय हिंसाचारामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. आमच्या रस्त्यांवर प्रियजनांच्या अंत्यसंस्कारांचे दृश्य आहे, तर अनेक मातांना आपल्या मुलांच्या बेपत्ता होण्याचं दु:ख सहन करावं लागत आहे. अशा वेळी पाकिस्तान सुपर लीगसारखा मोठा क्रीडा सोहळा आमच्या वेदनांची क्रूर चेष्टा असल्यासारखा वाटतो,” असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

तर दुसरीकडे काही परदेशी खेळाडूंनी पाकिस्तान सुपर लीगसोबतचे करार रद्द करून २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये ‘रिप्लेसमेंट’ खेळाडू म्हणून सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. झिम्बाब्वेचा ब्लेसिंग मुजारबानी आणि श्रीलंकेचा दासुन शनाका यांनी PSL फ्रँचायझींशी करार करूनही IPLची संधी मिळताच ती स्वीकारली. याआधी ऑस्ट्रेलियाचा जेक फ्रेझर-मॅकगर्क याने वैयक्तिक कारणांचा दाखला देत PSLमधून माघार घेतली होती.